एखाद्या नाटकाच्या मुख्य कथानकातील पात्रे जेव्हा प्रसंगाआड असतात तेव्हा ‘त्या दरम्यान त्यांच्यात काय घडत असेल, एखाद्या प्रसंगाची वेगळी बाजू प्रत्यक्षात दुसरीकडे उलगडली जात असेल का, असे प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात येत असतात. ‘अस्तित्व’ या नाटय़संस्थेतर्फे हाच विषय घेऊन एक आगळा प्रयोग करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ या नाटकावर आधारित दीर्घाक सादर करण्यात येणार आहे.
या नव्या प्रयोगातील पहिली संहिता ऋषिकेश कोळी यांनी लिहिली असून ती ‘पुरुष’ नाटकावर आधारित आहे. ‘वर खाली दोन पाय’ या दीर्घाकामध्ये गुलाबराव, अंबिका, सिद्धार्थ या ‘पुरुष’ नाटकातील पात्रांमध्ये ‘त्या दरम्यान’ काय घडते हे या दीर्घाकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता कुकुज क्लब, पाली हिल, कँडीज कॅफेजवळ, वांद्रे (पश्चिम) येथे होणाऱ्या कार्यक्रमात दीर्घाकाचे लेखक ऋषिकेश कोळी हे याचे वाचन करणार आहेत. खारदांडा येथील ‘हाइव्ह’ सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमास रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. येत्या वर्षभरात दर महिन्याला एक याप्रमाणे ‘त्या दरम्यान’वर आधारित बारा नव्या संहिता या उपक्रमात सादर करण्यात येणार आहेत.
‘पुरुष’ नाटकाच्या ‘त्या दरम्यान’चा नवा आयाम!
अस्तित्व’ या नाटय़संस्थेतर्फे हाच विषय घेऊन एक आगळा प्रयोग करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-02-2016 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience to get free admission in program held with the collaboration of cultural centre