ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत आपल्या उमेदवारीचा फुगा हवेत सोडून युतीच्या गोटात महाखळबळ उडवून देणारे रामदास आठवले यांच्या ठाण्यात शनिवारी होत असलेल्या शक्तीप्रदर्शनाच्या सभेत थेट ऑस्ट्रेलियन नृत्यांगनांचा ‘बलून डान्स’ही होणार आहे. या सभेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्यानेही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
लाखो रुपयांची उधळण करत उभारलेले अडीच हजार चौरस फुटाचे भव्यदिव्य व्यासपीठ..जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी खास ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या नर्तिका, असा शाही थाट शनिवारच्या या मेळाव्यासाठी आखण्यात आला आहे. शिवसेना-भाजप युतीमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या पक्षाची ‘ताकद’ दाखविण्यासाठी आठवले समर्थकांनी या मेळाव्याची जय्यत तयारी चालविली असून अधिकाधिक गर्दीला ‘सेन्ट्रल मैदाना’त खेचण्यासाठी ऑस्ट्रेलियन नर्तिकांच्या ‘बलून डान्स’चाही ठळक प्रचार केला जात आहे.
ठाणे शहरात शिवसेनेची सत्ता असून आठवले यांच्या मेळाव्यासाठी शिवसेना नेत्यांनीही सर्वप्रकारच्या मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत तसेच भाजप नेते विनोद तावडे यांनाही या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून यानिमित्ताने मांडलेला शाही थाट सध्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्यातील आघाडी सरकारला धडा शिकविण्याचा संकल्प करण्यासाठी म्हणून या मेळाव्याचे आयोजन केल्याचा प्रचार केला जात असला तरी या ‘संकल्पपूर्ती‘साठी लक्षावधी रुपयांची उधळण सुरु असल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांची तयारी, ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन आणि दलितांवर राज्यभर सुरू असलेले अत्याचार; असा ‘अजेंडा’ असलेल्या या मेळाव्याला या उधळपट्टी आणि विदेशी नर्तिकांच्या पदन्यासाने गालबोटच लागल्याची आंबेडकरवाद्यांची भावना आहे.

केवळ मनोरंजनाचा हेतू!
एका मोठय़ा फुग्यातून या ऑस्ट्रेलियन नर्तिकांना व्यासपीठावर आणले जाणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी दिली. या नृत्याची गरज काय, असे विचारताकार्यकर्त्यांचे मनोरंजन व्हायला हवे, असे ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेला ऑस्ट्रेलियातील महिला नर्तिकांना पहायची संधी मिळावी. यासाठी हे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader