आठवडय़ाची मुलाखत : रामदास भटकळ लेखक, प्रकाशक
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीमध्ये होत आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आलेले उत्सवी स्वरूप, अध्यक्षांच्या निवडीवरून होणारे वाद, राजकीय नेत्यांचा नको इतका हस्तक्षेप, गैरव्यवस्थापन आदींमुळे संमेलने निखळ साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक विचारमंथनाऐवजी वाईट कारणांकरिताच गाजतात. या पाश्र्वभूमीवर पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांच्याशी साधलेला संवाद.
* गेल्या ९० वर्षांची संमेलनाची परंपरा पाहता त्याच्या एकूण स्वरूपाबद्दल आपल्याला काय वाटतं?
संमेलनाला आज जे स्वरूप प्राप्त झाले आहे ते पाहता ते अनेकांना रुचणार नाही. परंतु ते काही आताच झाले आहे किंवा ते कोणी मुद्दाम केले आहे असेही नाही. संमेलनाच्या इतक्या वर्षांच्या वाटचालीत ते उत्क्रांत होत आले आहे. याला सध्या जत्रेचं, मेळ्याचं स्वरूप आले आहे. हे कोणाला आवडू शकते. कोणाला आवडणार नाही. पण जे झाले आहे त्याचा आपण स्वीकार करायला हवा. मी गेली ६५ वष्रे पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात आहे. आमची प्रकाशन संस्था तिथे दरवर्षी जात असते. पण मी स्वत: तिथे फारच कमी वेळा गेलो आहे. याचा अर्थ माझी त्याबद्दल तक्रार आहे असा होत नाही. म्हणण्याचा अर्थ इतकाच, की ज्यांना रस आहे त्यांनी तिथे सहभागी व्हावे, ज्यांना ते रुचत नाही त्यांनी जाऊ नये. पण त्याबद्दल तक्रार करण्याची आवश्यकता नाही. पण संमेलनाच्या काळात तिथे साहित्यविषयक जे उत्साहाचे वातावरण तयार होत असते, ते इतरत्र फारसे दिसत नाही.
* मग हे स्वरूप आणि त्याविषयीची निरनिराळी मते पाहता नागरी समाज म्हणून संमेलनाची गरज वाटते का?
हो. ती गरज आहेच. म्हणून तर संमेलन वाढले आहे. तिथे केवळ स्थानिकच नव्हे तर इतर ठिकाणांहूनही लोक जात असतात. लोकांनी ते वाढवले आहे. त्यामुळे त्याची आजवरची झालेली वाढ ही स्वाभाविकपणे, साहजिकपणे झालेली आहे.
* ही वाढ तुम्ही म्हणता तशी सहज असेल, तर संमेलनांनी भाषेचा व साहित्याचा आनंद तिथे येणाऱ्यांना दिला पाहिजे.
मी संमेलनांना फारसा गेला नसलो तरी त्याच्याबद्दल दरवर्षी माध्यमांतून वाचत-ऐकत असतो. त्यामुळे तिथे काय होते हे माहीत आहे. येथे एक लक्षात घ्यायला हवे की, संमेलनाच्या संयोजकांच्या कलाने तिथले सर्व कार्यक्रम आखले जातात. माझे वैयक्तिक मत असे आहे, की राजकारणाला तिथे जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्या राजकारणाचा एकूण साहित्याशी काही संबंध नसतो. परंतु ज्या राजकारणाचा साहित्याशी संबंध आहे त्याला तिथे अवकाश मिळत नाही. त्याच्याविषयी तिथे फारशी चर्चा होत नाही. पण नमित्तिक, तात्कालिक मुद्दय़ांना मात्र नेहमीच महत्त्व मिळतं. यात मूलभूत प्रश्न बाजूला पडतात. उदाहरणार्थ, अभिव्यक्तिस्वातंत्र्य. आणीबाणीच्या वेळीही हा मुद्दा होता, आताही आहेच. खरं तर त्याच्याविषयीची चर्चा संमेलनात व्हायला हवी.
* यंदाच्या संमेलनाविषयी..
मी व्यवसायातून निवृत्त झालो आहे, पण लेखक म्हणून जिवंत आहे. डोंबिवलीच्या संमेलनाला मी जाणार आहे. तिन्ही दिवस उपस्थित राहणं शक्य नाही, पण तिथे ‘प्रतिभायन’ या शीर्षकाखाली होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात माझ्यासह मेधा पाटकर व अच्युत गोडबोले हेही सहभागी होणार आहेत. आम्हा तिघांनी लेखनाखेरीज इतर क्षेत्रांतही काही काम केले आहे. अलीकडच्या काळातील त्यांचे लेखनही अनेकांनी वाचले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी मंडळी आणि त्यांच्या प्रतिभेचे पलू याच्याविषयी मुलाखतींतून जाणून घ्यावे, असे काहीसे त्याचे स्वरूप आहे.
* संमेलनातील अध्यक्षीय भाषण, परिसंवाद व इतर कार्यक्रम यांच्यात तोचतोचपणा आला आहे का?
संमेलनात बऱ्याच वृत्तीचे लोक येत असतात. या सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखं काही तरी संमेलनात असायला हवं या भूमिकेमुळे कार्यक्रमांत व परिसंवादांत तोचतोचपणा येत असावा. साहित्य महामंडळ याबद्दल ठरवत असतं. परंतु स्थानिक संयोजकांनाही ते याबद्दल विचारत असावेत, त्यांचा सल्ला घेत असावेत. त्यामुळे थोडी विविधताही येत असतेच. अध्यक्षांच्या भाषणाबाबत सांगायचे तर, काय बोलायचे, काय नाही ते अध्यक्षांनीच ठरवावे. मात्र, त्यांनी उत्स्फूर्तपणे बोलायला हवे. मला १९६५ साली हैदराबादमध्ये झालेले संमेलन आठवते. वा. ल. कुलकर्णी त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी ४० पानी अध्यक्षीय भाषण तिथे वाचून दाखविले. ते अनेकांना रटाळ वाटले. पण त्यांनी समारोपाचे भाषण उत्स्फूर्तपणे केले. ते मात्र सर्वाना आवडले. इथे मला संमेलनाच्या सध्याच्या स्वरूपात सुसूत्रता आणण्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. सध्या व्यवस्थापनशास्त्र बरेच प्रगत झाले आहे. संमेलनात व्यवस्थापनाचा विचार तितकासा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या सुसूत्र व्यवस्थापनावर अभ्यास व्हायला हवा. एखाद्या व्यवस्थापनतज्ज्ञाकडून त्याविषयीची मार्गदर्शक संहिता करवून घ्यायला हवी. गेल्या पाच वर्षांतल्या संमेलन आयोजनाच्या अनुभवाचा विचार करून ग्रंथिदडीपासून ते परिसंवाद व इतर कार्यक्रमांचे व्यवस्थापन, लेखक-प्रकाशक-वक्ते यांना पाठवायच्या पत्रांचा मसुदा आदी अनेक बाबींचा समावेश असणारे एक ‘मॅन्युअल’ तयार करता येईल. महामंडळाने त्यासाठी प्रयत्न करायला हवा. हा अभ्यास करायला आणि त्याद्वारे तशी संहिता निर्माण व्हायला काही खर्च होईल. पण तो फक्त एकदाच होईल. यातून जी मार्गदर्शक संहिता तयार होईल तिच्यामुळे पुढील काळात गरव्यवस्थापनामुळे विनाकारण होणारा खर्च काही प्रमाणात तरी कमी होईल.
* ..पण संमेलनाध्यक्षाच्या निवडपद्धतीबद्दल काय?
माझं फार आधीपासून हे मत आहे, की संमेलनाध्यक्षाला कोणतेही अधिकार नसतात. त्यामुळे हे पद मानाचं पद आहे. त्यामुळे ज्या पदाला काहीच अधिकार नाहीत त्याच्यासाठी निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही. हा मान निवडणुकीशिवायही देता येईल. महामंडळाचे अध्यक्ष, गतवर्षीचे अध्यक्ष आणि नियोजित ठिकाणचे स्वागताध्यक्ष यांनी त्या त्या वर्षीच्या अध्यक्षाची निवड करावी. यात काही एक सापेक्षता येईलच. पण दर तीन वर्षांनी महामंडळाचे अध्यक्ष आणि दरवर्षी संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष बदलत असल्याने या निवडीत वैविध्य येण्याची शक्यता अधिक आहे.
* संमेलनात पुस्तकविक्रीही मोठय़ा प्रमाणात होत असते. परंतु जगभरात होणाऱ्या ग्रंथमेळ्यांच्या पाश्र्वभूमीवर तुम्ही याकडे कसे पाहता?
– ग्रंथमेळ्यांमध्ये पुस्तकविक्रीला केंद्रस्थानी ठेवलेलं असत. पण संमेलनात तसे नाही. इथे पुस्तकविक्रीशिवाय इतर कार्यक्रम केंद्रस्थानी असतात. त्यामुळे इथले मुख्य अवधान निराळे असते. तरीही पुस्तकविक्री होत असते. इथे येणारे प्रकाशक दरवर्षी आपल्या सोयीसुविधांबाबत तक्रारी करत असतात. त्यावर काही उपाय करता येतील. शेवटी वाचनसंस्कृती हा मोठा विषय आहे. त्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतील.
मुलाखत : प्रसाद हावळे