मुंबई, ठाणे, वसई : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी विचारणा करताच टॅक्सी, रिक्षाचालकांकडून मिळणारा नकार आणि त्यानंतर यांना नेमके कुठे जायचे असते या प्रवाशांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांनंतरही मिळाल्याचे दिसत नाही. मुंबईसह ठाण्यात भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडे झाल्याचे दिसते. वसई-विरारमध्ये तर या तक्रारी करण्याचीही मुभा प्रवाशांना मिळत नसल्याचे दिसते.
सणासुदीच्या उत्साहात बाजारपेठेतील गर्दी गेल्या काही महिन्यांपासून वाढली आहे. बाजारपेठा, स्थानकांचे परिसर येथे टॅक्सी, रिक्षाचालकांच्या रांगा उभ्या असतात. मात्र नागरिकांच्या वाटय़ाची पायपीट चुकलेली नाही. जवळचे, विशिष्ट ठिकाणचे भाडे सर्रास नाकारले जाते. त्यातून एखाद्या प्रवाशाने अधिक भाडे देण्याची तयारी दाखवलीच तर त्याला मात्र टॅक्सी किंवा रिक्षातून ईप्सित स्थळी जाता येते. गर्दी, सण-उत्सवांचे दिवस, पाऊस अशा वेळी हमखास प्रवाशांना नकार देण्याचे प्रकार अगदी रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून घडतात.
हेही वाचा >>> सव्वा वर्षांत पाच शासन निर्णय मागे; शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘उत्तम संवादा’वर विरोधकांना शंका
मुंबई शहर आणि उपनगरांत वाहतूक विभागाने सुरू केलेल्या मदतवाहिनीवर रिक्षा, टॅक्सीचालकांविरोधातील सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याच्या आहेत. रिक्षा, टॅक्सीचालकांनी प्रवाशांशी गैरवर्तन केले, भाडे नाकारले, जादा भाडे मागितले तर प्रवासी थेट आरटीओच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा ईमेलवर तक्रार दाखल करतात. त्यात वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओच्या क्षेत्रात साधारण दोन महिन्यांत म्हणजे १५ जुलै ते २० सप्टेंबपर्यंत चालकांनी भाडे नाकारल्याच्या साधारण ५७७ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या सर्वच शहरांमध्ये गेल्या नऊ महिन्यांत भाडे नाकारणाऱ्या २९१ प्रवासी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात केवळ रिक्षांचा समावेश आहे. शहरात काळय़ा-पिवळी टॅक्सीने प्रवास करण्याचे प्रमाण नगण्य असून शहरातील अंतर्गत प्रवासासाठी रिक्षांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. यामुळे कारवाईत रिक्षांची संख्या जास्त आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तसेच ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून भाडे नाकारणाऱ्या ६४ प्रवासी वाहनांवर कारवाई केली आहे.
वसईत तक्रारीलाही जागा नाही.
वसई- विरार शहरात अनेकदा प्रवाशांना नेण्यास नकार देण्याचे प्रकार घडतात; परंतु त्याची तक्रार करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा मदत क्रमांक उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रार करायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारींवर भरारी पथकाला सांगून कारवाई केली जाते, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक अधिकारी प्रवीण बागडे यांनी सांगितले आहे. मीरा- भाईंदरमध्ये एकही तक्रारी आलेली नसल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे यांनी सांगितले.
तक्रारी किती?
वडाळा आरटीओ
(१७ जुलै ते २१ सप्टेंबर) – २४६
बोरिवली आरटीओ
(१७ जुलै ते २२ सप्टेंबर) – १०१
अंधेरी आरटीओ
(१५ जुलै ते २२ सप्टेंबर) – २३०
ठाणे पोलीस आयुक्तालय – (जानेवारी ते सप्टेंबर) – २९१
ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग – (जानेवारी ते सप्टेंबर) झ्र् ६४
अनधिकृत शेअर टॅक्सी
बहुतेक ठिकाणी मीटरनुसार
भाडे नाकारले जाते.
मान्यता नसतानाही शेअर टॅक्सी किंवा रिक्षा चालवल्या जातात. त्यासाठी प्रत्येक माणसानुसार भाडे आकारले जाते. त्यामुळे एकटय़ाच प्रवाशाला इतर दोन किंवा तीन प्रवासी मिळेपर्यंत वाट पाहावी लागते अथवा घाई असल्यास चार प्रवाशांचे म्हणजे मीटरपेक्षा अधिक भाडे द्यावे लागते.