रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले, रिक्षा चालक भाडे नाकारतात, रिक्षा चालकाने फसवले.. अशाच प्रकारचे किस्से कानावर पडत असतात. पण रिक्षात राहिलेली बॅग परत करून जयराम अशोक खरवाल या रिक्षा चालकाने एक नवा आदर्श ठेवला आहे.
भांडूप येथील रहिवाशी अमित नायर यांनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मालवणी येथून जयराम यांच्या रिक्षाने प्रवास केला. नायर हे मालवणीच्या फायर जंक्शन येथे उतरले आणि तेथून त्यांनी टॅक्सी पकडून पुढील प्रवास केला. पण यात नायर त्यांची बॅग रिक्षातच विसरले. नायर हे एका खासगी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असून, त्यांच्या बॅगेत आयपॅड, सॅमसंग टॅबलेट आणि इतर ५० हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू होत्या. आपण बॅग रिक्षात विसरलो असल्याचे लक्षात येताच नायर यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पण त्याआधीच रिक्षाचालक जयराम खरवाल पोलीस ठाण्यात बॅग घेऊन पोहोचले होते. जयरामने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी देखील कौतुक केले. जयरामला पोलीस ठाण्याकडून सन्मानित करण्याचा आमचा विचार असल्याचेही पोलीस अधिकारी मिलिंद खेटले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा