लोकसत्ता खास प्रतिनधी
मुंबई : रिक्षाचालकाने वसई परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही पीडित तरुणी गोरेगाव रेल्वे स्थानकानजिक गंभीर अवस्थेत पोलिसांना सापडली. याप्रकरणी कसून तपास करून पोलिसांनी वालीव झोपडपट्टी परिसरातून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली. याप्रकणी वनराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित मुलीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पीडित तरुणीवर लैगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलगी २२ जानेवारी रोजी गोरेगांव पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एकटीच सापडली होती. दरम्यान, वसई स्थानक परिसरात २१ जानेवारी रोजी रात्री भेटलेल्या एका अनोळखी रिक्षाचालकाने आपल्याला वसई जवळील सागरी चौपाटीवर नेले व तेथे आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. पीडित मुलीकडून प्राप्त झालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे विरार – चर्चगेट दरम्यानचा रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपी राजरतन सदाशिव वायवळ (३२) याला अटक करण्यात आली. आरोपीला वालीव येथील खैरपाडा झोपडपट्टीतून ताब्यात घेण्यात आले.