आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसून प्रवाशांना वेठीस धरायचे आणि मागण्या पदरात पाडून घ्यायच्या, हे सूत्र वर्षांनुवर्ष वापरणाऱ्या शरद रावप्रणीत मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स या संघटनेने बुधवारी पुकारलेल्या रिक्षासंपाला मुंबई-पुणे वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत काही ठरावीक उपनगरांमध्ये कडकडीत बंद असला, तरी या संपात शिवसेनेची संघटना सहभागी नसल्याने संपाचा फार परिणाम जाणवला नाही. त्यामुळे शरद राव यांच्या नेतृत्वाखाली दरारा प्रस्थापित करणाऱ्या या संघटनेच्या वर्चस्वाला नव्या नेतृत्वाखाली, शशांक राव यांना, धक्का बसल्याचे चित्र बुधवारी दिसले. तरी मुंबईतील प्रवाशांची मात्र या संपामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
‘ओला’, ‘उबर’ हे टॅक्सी समन्वयक (अॅग्रीगेटर) बेकायदेशीरपणे आपला व्यवसाय करत असून त्यांच्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होत आहे. या दोन्ही कंपन्यांना बंदी घालावी, हकीम समिती पुन:प्रस्थापित करून त्यांच्या शिफारशी अमलात आणाव्यात, रिक्षा-टॅक्सी चालकांना ‘पब्लिक सर्व्हट’चा दर्जा मिळावा अशा विविध मागण्यांसाठी, शरद राव यांचे पुत्र शशांक यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र या संपात इतर संघटना सहभागी झाल्या नव्हत्या. बुधवारी सकाळपासून मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रिक्षांची वानवा होती. त्यातही संघटनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम उपनगरांमध्ये तर सकाळी एकही रिक्षा रस्त्यावर उतरली नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र शाळेत जाणाऱ्या मुलांसाठीच्या रिक्षा सुरू ठेवत या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न संघटनेने केला.
दरम्यान, या संपात इतर रिक्षा संघटना सहभागी न झाल्याने या संपाचा प्रभाव म्हणावा तसा जाणवला नाही. संघटनेच्या म्हणण्यानुसार मुंबईत हा संप ९० टक्के यशस्वी झाला. मात्र प्रत्यक्षात ७० टक्के प्रभाव जाणवल्याचे दिसत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरांत रिक्षा सुरळीत सुरू होत्या. पुण्यात काही प्रमाणात संपाचा फटका बसला. मात्र उर्वरित महाराष्ट्रात रिक्षाचालकांनी संपात सहभागी होऊन दिवसभराची कमाई गमावण्यापेक्षा धंदा करणे पसंत केले. याआधी प्रत्येक संप जवळपास १०० टक्के यशस्वी करून दाखवणाऱ्या या संघटनेच्या बुधवारच्या संपाला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे या संघटनेच्या वर्चस्वाला धक्का पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत दुय्यम समजल्या जाणाऱ्या शिवसेनेची संघटना वा स्वाभिमान संघटना यांनी चांगलेच हात-पाय पसरल्याचे चित्र दिसत आहे.
* रिक्षा संप चालू असतानाच राज्याचे परिवहनमंत्री बुधवारी रस्त्यावर उतरले, त्यांनी विविध उपनगरांत रिक्षाने प्रवास करत प्रवासी व रिक्षाचालक यांच्याशी संवाद साधला.
* रावते बोरिवली येथील रिक्षा थांब्यावर अचानक आले. तेथील एका रिक्षेतून त्यांनी प्रवास सुरू केला. या प्रवासात त्यांनी रिक्षा चालकाला त्यांना येणाऱ्या अडचणी तर विचारल्याच, शिवाय प्रवाशांशीही संवाद साधला. संप असला, तरी तुम्हाला फार अडचण होऊन देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
* बोरिवलीत झालेल्या या प्रकाराची पुनरावृत्ती नंतर अंधेरी, विलेपार्ले, शीव, घाटकोपर, विक्रोळी आदी उपनगरांतही झाली. रावते यांच्या या रिक्षा प्रवासाचा एकत्रित खर्च २०० रुपयांच्या आसपास झाला.
* संपाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आम्हाला लोकांना पटवून द्यायचे होते. तसेच रिक्षा चालकांना या संपात सहभागी होऊ नका, असेही सुचवायचे होते. त्यामुळे हा रिक्षाप्रवास केल्याचे दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.
ओला व उबर या कंपन्यांविरोधात टॅक्सी चालकांनी संप करणे समजू शकतो. मात्र रिक्षांचा संप करून नाहक प्रवाशांना वेठीला धरणे योग्य नव्हते. शरद राव यांच्याबद्दल आदर आहे. मात्र त्यांच्या मुलाने अशा प्रकारे उगाचच संपाची हाक देणे चूक आहे.
-दिवाकर रावते, परिवहनमंत्री