महाराष्ट्र सरकार ऑटोरिक्षा चालक मालकांशी कोणतीही चर्चा न करता एकतर्फी त्यांच्या विरोधी धोरणे राबवून त्यांना बेमुदत आंदोलन करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केला आहे. ऑटोरिक्षाचे किमान आयुष्यमान कमी करणे, तीन चाकी ऑटोरिक्षांऐवजी कॉड्रिसायकल (चार चाकी वाहन) नावाचे वाहन आणणे, सहा आसनी टॅक्सींना परवानगी देणे, २८ सप्टेंबर २०१२ रोजी प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयानुसार १ मे २०१३ पासून भाडे सुधारास नकार देऊन स्वत:च्या निर्णयाच्या विरोधात वागणे, स्वयंरोजगारीत ऑटोरिक्षाचलक/ मालक आणि टॅक्सी  चालक / मालक यांच्यासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षितता मंडळाच्या निर्मितीस नकार देणे इ. शासन राबवित असलेल्या ऑटोरिक्षा चालक मालक विरोधी धोरणांच्या विरोधात संघटनेतर्फे संपाचा इशारा देण्यात आला आहे. ह्या धेरणांच्या विरोधात ‘पब्लिक सर्व्हण्ट’च्या मागणीसह इतर अनेक मागण्यासाठी हजारो ऑटोरिक्षा चालक, मालक बुधवार १२ जून पासून इतर कामगार वर्गासह वीर जिजामाता भोसले उद्यान ते मंत्रालय असा मोर्चा काढणार आहेत. तसेच १५ जून रोजी पिंपरी चिंचवड येथे ऑटोरिक्षा चालक, मालकांचा महाराष्ट्रव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला असून १८ जून पासून अनिश्चित काळासाठी महाराष्ट्रव्यापी ऑटोरिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.