मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे १५.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नियोजित वेळेत पावसाने हजेरी लावली नाही, किंवा पाऊस बरसून गायब झाल्यास मुंबईमध्ये पाणी कपात लागू करण्याची नामुष्की मुंबई महानगरपालिकेवर ओढवण्याची शक्यता आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सातही तलावांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे वर्षभराची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या काहिलीने मुंबईकर हैराण होऊ लागले आहेत. त्याच वेळी तलावांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. तसेच ठाणे येथे कूपनलिका खोदताना जलबोगद्याला पडलेल्या भगदाडामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला होता. जलबोगद्याच्या कामामुळे मुंबईकरांवर पाणी कपात लादण्यात आली होती. अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला होता.
हेही वाचा >>>मुंबई: महिला पोलिसांबद्दल ट्वीटरवर अश्लील विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजघडीला (२४ मे २०२३ रोजी सकाळी ६ वाजता) सरासरी १५.५७ टक्के म्हणजे २ लाख २५ हजार ३८८ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. दिवसेंदिवस पाणीसाठा खालावत असून मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाचे पावसाकडे डोळे लागले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र पाऊस वेळेवर आणि समाधानकारक पडणे गरजेचे आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यास पुरवठ्याबाबत कोणतेही नियोजन करण्याची गरज भासणार नाही. मात्र वेळेत पाऊस पडला नाही किंवा दमदार हजेरी लावून पाऊस गायब झाला तर पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास जूनचा दुसऱ्याआठवड्यादरम्यान मुंबईमध्ये पाणी संकट उभे राहील. परिणामी, मुंबईकरांवर नाईलाजाने पाणी कपात लागू करावी लागेल, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा >>>“…एवढी वाईट वेळ अजून आमच्यावर आली नाही”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत संजय राऊतांचं टीकास्र!
… तर राखीव साठ्यातून तहान भागविणार
सातही तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईकरांना पुढील वर्षभर सुरळीत, पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होते. समाधानकारक पावसामुळे १ ऑक्टोबर २०२२ रोजी तलाव काठोकाठ भरले होते. त्यामुळे गेले वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य झाले. मात्र मेदरम्यान तलावांतील जलसाठा आटू लागला आहे. तलावात १५.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पाणीसाठा खालावल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी तलावांतील राखीव पाणीसाठ्याचा वापर महानगरपालिकेला करता येतो. तलावांतील पाणी साठवणुकीच्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ८ टक्के साठा राखीव असतो. आपत्कालीन परिस्थितीतच राखीव साठ्यातील पाण्याचा वापर करता येतो. यंदा पावसाने नियोजित वेळेत हजेरी लावली नाही, तर राखीव साठ्यातून मुंबईकरांची तहान भागवावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये तात्काळ पाणी कपात करण्यात येणार नाही. पुढील महिन्यात तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. धरणांतील राखीव पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास मे महिन्यात पाणी कपात करण्यात येणार नाही. –पी. वेलरासू,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त