मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत.

राज्यभरातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी दीपोत्सवापूर्वी वेतन देण्याची सूचना राज्य सरकारने संबंधितांना केली आहे. त्यानुसार काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे. त्याचबरोबर एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वी वेतन मिळावे यासाठी सरकारने ३५० कोटी रुपये सवलत मूल्य परतावा रक्कम दिली आहे. असे असतानाही एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान, आचारसंहिता लागू असल्यामुळे दिवाळीपूर्वी वेतन देण्यात येत नसल्याचे समजते.

हेही वाचा – महिला तिकीट तपासनीसाने एकाच दिवसात पकडले १०३ विनातिकीट प्रवासी, वाचा कसे आणि किती दंड वसूल केला

हेही वाचा – ‘कोल्ड प्ले’, ‘दिलजीत कॉन्सर्ट’ तिकीट काळाबाजार प्रकरण : ‘ईडी’चे देशभरात १३ ठिकाणी छापे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांना ती लागू आहे असे दुटप्पी धोरण अवलंबिण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एकीकडे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर बनलेली असतानाच आता दिवाळीपूर्वी वेतनही मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून महिनाभर काम केल्यावर वेतन मिळते त्याचा व आचारसंहितेचा संबंध नसून प्रशासनाने तात्काळ कर्मचारी व अधिकाऱ्याना वेतन द्यावे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.