मुंबई : मुंबईमधील ठिकठिकाणच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी कंत्राटदारांना कार्यादेश देऊन तीन महिने लोटल्यानंतरही कामांना सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र पाठवून पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे. शिवडीतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवडी परिसरातील टी. जे. मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६,०७८ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत या कामासाठी पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली आणि जानेवारीत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले.

हेही वाचा >>> मुंबई : पर्यावरण मंजुरी यापुढे विभागता येणार!, रखडलेल्या गृहप्रकल्पांना होणारा विलंब टळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीत या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र अद्यापही कामांना सुरुवात झालेली नाही, अशी तक्रार सर्वात आधी भाजपचे कुलाबा परिसरातील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली होती. त्याचबरोबर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांची कामे सुरू न झाल्याबद्दल आक्षेप घेतले होते. त्यानंतर प्रशासनाने आता तीन कंत्राटदारांना मिळून १६ कोटी रुपये दंड केला.  त्यापैकी दोन कंत्राटदारांना पश्चिम उपनगरांतील, तर एकाला शहर भागातील रस्त्यांचे काम देण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई : योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

शिवडीमधील ठोकरसी जीवराज मार्ग (टी. जे. मार्ग) सतत गजबजलेला असतो. या रस्त्याच्या आजूबाजूला वसाहती असून या रस्त्यावर कायम पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते. दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. दोन टप्प्यात या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र अजून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात नागिरकांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awaiting concreting of the road in shivdi mumbai print news ysh