मुंबई : परिवहन विभागाने वाहनांच्या तपासणीत सूसुत्रता आणण्यासाठी राज्यात स्वयंचालित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी जारी केलेली निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेली परिवहन मंत्र्यांची अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नाही. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु सरकार बदलल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीविना ‘जैसे थे’ आहे. नव्या सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच या केंद्राच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी करण्यात येते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना तपासणी करण्यात येते. त्यानंतर दोन वर्षांनी दुसऱ्यांदा आणि नंतर दरवर्षी वाहनाची तपासणी करण्यात येते. वाहनाचे ब्रेक, सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाइट आणि वाहनामुळे होणारे प्रदुषण आदी तपासणी करण्यात येते. मात्र सध्या पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वाहन तपासणीसाठी बराच वेळ लागतो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही.
परिवहन विभागाने नाशिकमधील पंचवटी परिसरात ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारले असून तेथे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात येते. त्यासाठी तेथे स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक आदी यंत्रणा उभारण्यात आली आहे. अशाच प्रकारचे केंद्र मुंबईतील एसटी महामंडळाच्या कुर्ला आगारात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा काढण्या आल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदारही निश्चित करण्यात आला आहे. या केंद्राचा आराखडाही तयार आहे. परंतु निविदा प्रक्रियेअंती निश्चित केलेल्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत आवश्यक असलेल्या अंतिम मंजुरीचा प्रस्ताव माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठविण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाचा विचारच झाला नाही. दरम्यानच्या काळात राज्यात नवे सरकार सत्तेवर आले. अद्याप नव्या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. या प्रस्तावासाठी नव्या सरकाची मंजुरी मिळणे आवशक आहे.
कुर्ला आगाराचा परिसर मोठा असून सध्या तेथे एसटी गाड्यांच्या परिचालनाशिवाय अन्य कामे होत नाहीत. स्वयंचलित केंद्र उभारण्यात आल्यानंतर तेथे दिवसाला सुमारे २०० हून अधिक वाहनांची तपासणी करता येईल. मात्र या केंद्राच्या उभारणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला परिवहन मंत्र्यांकडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच केंद्राची उभारणी होऊ शकेल, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
आणखी १० ठिकाणी वाहन तपासणी केंद्र उभारणार
मुंबईतील कुर्ला नेहरू नगर आगारासह ताडदेव, ठाण्यातील मर्फी, कल्याणमधील नांदिवली, पनवेलमधील तळोजा, नागपूरमधील हिंगणा, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पुण्यातील दिवे घाट, तर कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती येथेही हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीही निविदा प्रक्रिया सुरू असून तीन महिन्यांत ती पूर्ण होईल आणि त्यानंतर १८ महिन्यांत केंद्राच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.