मुंबईवरील २६/११ च्या भीषण अतिरेकी हल्ल्याचा अत्यंत जोखमीचा व रात्रंदिवस खपून यशस्वीपणे तपास करुन पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकावण्यास सहाय्यभूत ठरलेल्या ४६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राज्य सरकार रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करणार आहे. सन्मानार्थीमध्ये दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया, पोलीस महानिरीक्षक देवेन भारती, प्रमुख तपास अधिकारी रमेश महाले या अधिकाऱ्यांबरोबरच एक पोलीस सहआयुक्त, १६ पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि १६ पोलीस शिपायांचा समावेश आहे. या संदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने सारा देश हादरला होता. या हल्ल्याच्या वेळीच पोलिसांनी प्राणाची बाजी लावून अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडले होते. त्यानंतर तीन दिवस पोलीस व एनएसजी कमांडोने केलेल्या कारवाईत ९ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतर या भीषण हल्ल्याचा तापस करून अतिरेक्यांच्या मागे पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध करणे आणि कसाबला फासावर लटकविण्यासाठी पुरावे जमा करणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच होते. त्यानुसार तीनचार वर्षे रात्रंदिवस कमालीची मेहनत करून व गुप्तता पाळून मुंबई पोलिसांनी तपासाचे हे शिवधनुष्य पेलले आणि त्यांनी जमा केलेल्या भक्कम पुराव्यामुळेच कसाबला फासावर लटकावणे शक्य झाले. त्याची योग्य दखल घेऊन आंतराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या या प्रकरणाच्या तपासात सहभागी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.
जोखमीच्या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यासंबंधी राज्य सरकारने ३०ऑगस्ट १९९६ व १३ डिसेंबर ११९९ आदेश काढून मार्गदर्शक तत्वे ठरविली आहेत. त्यात थोडा बदल करुन मुंबई हल्ला प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना काही वाढीव रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्राकडून देण्यात आली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा