‘सामान्य गणित’ हा विषय वगळता मुंबई विभागातून विविध विषयावर प्रथम झळकलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पारितोषिके शनिवारी जाहीर करण्यात आली. ‘सामान्य गणित’ हा विषय नवीन असल्याने या विषयातील ‘टॉपर’च्या पारितोषिकाचे प्रायोजकत्त्व अद्याप कुणी स्वीकारलेले नाही. त्यामुळे हा विषय वगळता अन्य वेगवेगळ्या विषयांत सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे मंडळाने जाहीर केली.
मालाडच्या ‘चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी’च्या नीती व्यास हिने ‘गणित’ विषयात १४९ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कोणत्याही खासगी क्लास वा कोचिंगशिवाय केवळ शाळेतील शिक्षकांनी आपल्या अभ्यासावर घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळविणे शक्य झाले, असे नीती सांगते. शाळा सुटल्यानंतर दररोज तासभर संबंधित विषयाचे शिक्षक आमचे जादाचे सराव वर्ग घेत. त्यात आमचे शंकानिरसन करण्याबरोबरच प्रश्न आणि गणित सोडविण्याचा खूप सराव करून घेतला जात असे, अशा शब्दांत नीतीने आपल्या यशाचे गमक सांगितले.
नीतीला डॉक्टर बनायचे आहे. नीतीबरोबरच डोंबिवलीच्या ‘अभिनव इंग्लिश विद्यालया’च्या असित तरसोडे याने गणितात १४९ गुणांची कमाई केली आहे.
कांदिवलीच्या ‘अवर लेडी ऑफ रेमेडी हायस्कूल’च्या दीपा हेगडे हिने ‘विज्ञाना’त पैकीच्या पैकी गुण (१००) मिळवून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर दहिसरच्या ‘व्ही. पी. मंडल विद्या मंदिर’ शाळेचा सोहन गुर्जर सामाजिकशास्त्रात पैकीच्या पैकी गुण (१००गुण) मिळून पहिला आला आहे. संस्कृत (द्वितीय) भाषेतही १०० गुण मिळवून पहिला येण्याचा मान सोहमने पटकावला आहे. सोहमला सर्व विषयात मिळून ९८.५५ टक्के गुण मिळाले आहेत.
विक्रोळीच्या ‘विकास हायस्कुल’च्या संपदा शिवकर हिने मराठी (प्रथम भाषा) विषयातून एकूण ९५ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. याच शाळेच्या वैभवी पडवळ हिने इंग्रजीतून (द्वितीय भाषा) ९८ गुणांची कमाई करीत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
वैभवीने संस्कृतमध्येही पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे, शाळेचे दहावीच्या परीक्षेतील हे तिहेरी यश म्हणायला हवे. पाठांतरापेक्षा स्वत:च्या भाषेत उत्तरे लिहिण्याची सवय अंगी बाणवल्यानेच भाषा विषयांमध्ये इतक्या गुणांची कमाई आपण करू शकले, असे वैभवी सांगते. तर वाशीच्या ‘फादर अ‍ॅग्नेल मल्टीपर्पज शाळे’ची अनन्या नायक इंग्रजी (प्रथम भाषा) विषयात ९४ गुण मिळवून पहिली आली आहे.

Story img Loader