मुंबई: नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ६८ व्या केंद्रीय रेल्वे सप्ताहामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० रेल्वे अधिकारी आणि ५० कर्मचाऱ्यांना केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ देऊन गौरविण्यात आले. त्यात मध्य रेल्वेतील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे नुकताच ६८ व्या केंद्रीय रेल्वे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० रेल्वे अधिकारी आणि ५० रेल्वे कर्मचाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट सेवेसाठी २१ जणांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वेतील तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. शिवराज पी. मानसपुरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असून सध्या ते मध्य रेल्वेच्या मुख्यजनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक धर्मेंद्र कुमार आणि सुनील डी. नैनानी, नागपूर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर) जयप्रकाश दिवांगन, सोलापूर विभागातील वरिष्ठ विभाग अभियंता संजय पोळ, विभागीय वरिष्ठ वित्त व्यवस्थापक विवेक एन. होके, पुणे विभागातील विभागीय सिग्नल आणि दूरसंचार पदावरील सुधांशू मित्तल यांना सन्मानित करण्यात आले. मध्य रेल्वेला उत्कृष्ट कामगिरीसाठी ४ विभागीय शिल्ड प्राप्त झाल्या. यात सर्वसमावेशक आरोग्य सेवा चषक, स्टोअर चषक (साहित्य व्यवस्थापन), कार्मिक विभाग चषक, पर्यावरण आणि स्वच्छता चषकाचा समावेश आहे. या चार उत्कृष्ट विभागाच्या शिल्ड मध्य रेल्वेच्या वतीने महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी स्वीकारल्या.