मुंबई विद्यापीठाने आदर्श महाविद्यालय म्हणून केलेली पाल्र्याच्या साठय़े महाविद्यालयाची निवड वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने २६ जानेवारीला पाच महाविद्यालयांना आदर्श महाविद्यालय म्हणून घोषित केले. मात्र यांपैकी साठय़े महाविद्यालय हे अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्याची नियमबाह्य़ नियुक्ती, मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा वाद, त्यांना महाविद्यालयात मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीवरून झालेल्या तक्रारी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्कवसुली या बाबत विद्यापीठाच्या  विविध कक्षांकडे तक्रारी प्रलंबित आहेत. यांपैकी काही तक्रारींमध्ये तथ्यही असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे २६ जानेवारीला झालेल्या पुरस्कार सोहळ्यात साठय़े महाविद्यालयाच्या नावाची घोषणा होताच मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. कार्यक्रम संपताच कार्यकर्त्यांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आदींची भेट घेऊन चर्चाही केली. विद्यापीठाच्याच विविध प्राधिकरणांनी, समित्यांनी संबंधित महाविद्यालयाला दोषी ठरविलेले आहे. काही प्रकरणांमध्ये तर महाविद्यालयाला दंडही झाला आहे. तरीही विद्यापीठाचे नियम गुंडाळणारे महाविद्यालय आदर्श कसे ठरू शकते, असा सवाल मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी केला. ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून साठय़े महाविद्यालयाला दिलेला पुरस्कार रद्दबातल करण्याची मागणीही त्यांनी केली.

Story img Loader