इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : मेट्रोसाठी आरे वसाहतीतील झाडे कापण्यावरून राजकारण रंगलेले असताना आता या वसाहतीतील झाडांच्या फांद्या मेट्रोच्या कामांसाठी कापण्यात येणार आहेत. सुमारे १११ झाडांवर फांद्या छाटण्यासाठी नोटिसा लावण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर या फांद्या कापण्यासाठी रस्ताही बंद करण्यात आला असल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कुलाबा ते सीप्ज या मेट्रो तीन मार्गाच्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील २७०० झाडे कापण्यास शिवसेनेने विरोध केला होता. त्यावरून शिवसेना व भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. त्यामुळे आरे वसाहत हा संवेदनशील विषय झालेला आहे. मात्र आता पुन्हा एकदा आरे वसाहतीतील काही झाडांवर नोटिसा लावल्यामुळे खळबळ उडाली आहे. या वसाहतीतील १११ झाडांवर अशा प्रकारची नोटीस लावण्यात आली आहे. गोरेगाव चेक नाका ते सारीपूत नगर येथे मेट्रो कारचे डबे वाहून नेण्यात येणार आहेत. हे डबे दिनकर देसाई मार्गे आरे वसाहतीतील सारीपूत नगर येथील ठिकाणी हे डबे पोहोचवण्यात येणार आहेत. मात्र हे डबे नेताना झाडांच्या फांद्या आड येणार असल्यामुळे या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.
फांद्यांची छाटणी करण्यासाठी या भागातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याला स्थानिक रहिवाशांसह पर्यावरण कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फांद्या छाटण्यासाठी वसाहतीतील रस्ता बंद करण्याची आवश्यकता का आहे, असा सवाल वॉचडॉग फाऊंडेशनचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी केला आहे. फांद्या कापण्याच्या नावाखाली झाडांना बोडके केले जाते. आरे वसाहतीत अनेक वर्षांपासूनची झाडे पूर्ण वाढलेली आहेत. त्यांच्या फांद्या कापण्यास आमचा व रहिवाशांचा विरोध आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मेट्रो प्रशासनाने याबाबत वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार आम्ही सध्या नोटीस लावली आहे. मात्र या कामासाठी फांद्यांची छाटणी करता येते का याबाबत आम्ही विधि खात्याचे मतही घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया उद्यान अधिक्षण जितेंद्र परदेशी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा