कर्करोगाच्या रुग्णांवर केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम आयुर्वेदिक उपचारामुळे कमी करता येतात, हे अॅलोपॅथीच्या कसोटय़ांवर सिद्ध करणारा शोधनिबंध डॉ. विनिता देशमुख यांनी ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’मध्ये वाचला, तेव्हा उपस्थित कर्करोग संशोधकांना आश्चर्य लपवता आले नाही. देश-विदेशातून आलेल्या संशोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरेही दिली़
अणुशक्तीनगर येथील ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’मध्ये कर्करोगावर मूलभूत संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील ८० संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधामध्ये प्रथमच आयुर्वेदाचा समावेश करण्यात आला. पुणे, वाघोली येथील ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’च्या कर्करोग संशोधन प्रकल्पात १९९४ पासून आयुर्वेदांतर्गत संशोधन सुरू आहे. आयुर्वेदातील प्रथम पीएच. डी.धारक वैद्य सदानंद सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत या प्रकल्पात  कर्करोगाच्या सुमारे साडेसात हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये निम्म्या महिला असून त्यातील बहुतेकांना स्तनाचा कर्करोग आहे. सुमारे दीडशे लहान मुलांचा समावेश असून सव्र्हायकल, तसेच तोंडाचा, आणि रक्ताच्या कर्करोगाचे विविध रुग्ण उपचारासाठी येतात. केमोथेरपी तसेच रेडिएशननंतर होणारे दुष्परिणाम आयुर्वेदामुळे कसे कमी करता येतील, यावर दोन दशकांहून अधिक काळ संशोधन सुरू आहे. या प्रकल्पात अॅलोपथीमधील विख्यात डॉ. अरविंद कुलकर्णी तसेच टाटा कॅन्सरच्या इम्युनोलॉजीच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुधा गांगल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
डॉ. देशमुख यांचे  कर्करोगावरील काम पाहून यापूर्वीच ‘डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी’ने पुण्यातील प्रकल्पासाठी दोन कोटींचे ‘कोबाल्ट मशीन’ दिल़े आयुर्वेदाच्या ग्रंथातही अर्बुद, द्विअर्बुद असा कर्करोगाचा उल्लेख सापडतो. केमोथेरपीनंतर रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवणे व दुष्परिणाम कमी करण्यात आयुर्वेदिक उपचाराने आलेल्या यशासंदर्भात हा शोधनिबंध तयार केला. यापूर्वी देश-विदेशात अनेक शोधनिबंध सादर केले असले तरी ‘बीएआरसी’मध्ये प्रथमच आयुर्वेदावर शोधनिबंध सादर करायला मिळणे, हा आयुर्वेदाचा सन्मान असल्याचे वैद्य सदानंद सरदेशमुख म्हणाले.
यापूर्वी न्यूयॉर्कमधील ‘सोसायटी फॉर इंटिग्रेटिव्ह आँकॉलॉजी’ने गेल्या वर्षी मेक्सिको येथे नवव्या कर्करोग परिषदेतही कर्करोगाच्या रुग्णांवरील आयुर्वेदिक उपचाराबाबत दहा रुग्णांचे शास्त्रीय अहवाल मांडून शोधनिबंध सादर केल्याचे डॉ. विनिता
यांनी सांगितले.

Story img Loader