मुंबई : राज्यात बुधवारी बीए.५ चे आणखी सहा रुग्ण आढळले असून त्यात पुण्यातील पाच तर नागपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २५ झाली.

पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि नागपूरच्या भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी)  केलेल्या जनुकीय अहवालांमध्ये बुधवारी बीए.५ चे सहा रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे आणि नागपूर येथे आढळलेल्या या रुग्णांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण २० ते ३५ वर्षे वयोगटातील, तर उर्वरित तिघांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. सर्व रुग्ण ६ ते १२ जून या कालावधीत करोना बाधित झाल्याचे आढळले होते. सहा रुग्णांपैकी पाच जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्व रुग्ण गृहविलगीकरणात बरे झाले आहेत. बीए. ४ आणि बीए.५ चे सध्या पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूर येथे ३ तर ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.

Story img Loader