मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर आता बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावर विद्यार्थ्यांना ३१ मेपर्यंत संकेतस्थळावर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बीए/बीएस्सी बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मे २०२४ रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आली होती. बीए/बीएस्सी बीएड या परिक्षेसाठी राज्यभरातून २ हजार ४५३ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांच्या त्यांच्या लॉग इन आयडीवर २९ मे २०२४ पासून उपलब्ध करून दिली आहे. लॉग इन आयडीवरील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्याबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांना ३१ मेपर्यंत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदवता येतील.
हेही वाचा…दक्षिण मुंबईतील काही भागात ३ व ४ जून दरम्यान पाणीकपात
प्रत्येक आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आक्षेप नोंदवण्याची संधी प्रथमच सीईटी कक्षाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्रश्न आणि उत्तरांसंबंधी नोंदवण्यात आलेले आक्षेप, निवेदन किंवा तक्रारी विचारात घेण्यात येणार नाहीत, अशी माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.