Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी रात्री म्हणजेच १२ ऑक्टोबरच्या रात्री ९ च्या सुमारास हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर बाबा सिद्दिकींनी रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणात जे आरोपपत्र आहे त्यात आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपपत्रात अनमोल बिश्नोईचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याने हल्लेखोरांना काय काय वचनं दिली ते स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोपपत्रात नेमका काय उल्लेख करण्यात आला आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या संपर्कात अनमोल बिश्नोई सातत्याने होता. त्या हल्लेखोरांना अनमोल बिश्नोईने फ्लॅट, पाच लाख रुपये आणि कार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची आठवण तो त्यांना सातत्याने करुन देत होता. अनमोल बिश्नोई हा सध्या अमेरिकेत आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या ज्यांनी केली त्या कटाचा अनमोल बिश्नोई हा मास्टरमाईंड आहे. १२ ऑक्टोबर २०२४ ला बाबा सिद्दिकींची हत्या करण्यात आली.
अनमोल बिश्नोई हा सातत्याने हल्लेखोरांच्या संपर्कात होता
अनमोल बिश्नोई हा हल्लेखोरांच्या संपर्कात होता. स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तो या लोकांशी संपर्कात होता. या हत्येची जबाबदारी शुभम लोणकरने घेतली आहे. त्यालाही बिश्नोई सूचना देत होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातले बहुतांश आरोपी हे १९ ते ४३ या वयोटातील आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दीकींचं रुटीन काय ते तपासा असं हल्लेखोरांना सांगितलं होतं. तसंच वांद्रे या ठिकाणी जे बाबा सिद्दीकींचं निवासस्थान आहे तिथेही तपासणी करा असंही सांगितलं होतं. बाबा सिद्दीकींवर नजर ठेवण्यास सांगितलं होतं असाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे.
अनमोलने या लोकांना काय सांगितलं?
भाई लोक तुम्हाला राम राम. सगळ्यांना लॉरेन्स भाईने राम राम म्हटलं आहे. कसे आहात सगळे? काय चाललं आहे? तुम्हाला जे काम करायचं आहे त्याची हिंमत ठेवा. वांद्रे परिसरात एक घर घेऊन ठेवा. तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला फोर व्हिलर, फ्लॅट आणि पाच लाख रुपये देण्याचं आश्वासन माझं. प्रत्येकाला एक एक फ्लॅट दिला जाईल. पाच लाख रुपयेही मिळतील. पण जे करायचं आहे ते विसरु नका. तुम्हाला सगळ्यांना बदला घ्यायचा आहे. असं म्हणत अनमोलने या सगळ्यांना हल्ला करण्यासाठी उद्युक्त केलं होतं असंही चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.