लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना हल्लेखोरांना मदत करण्यासाठी पाच लाख रुपये मिळाल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. कटात सामील होण्यासाठी आणि गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत करण्यासाठी आरोपी शुभम लोणकरला ही रक्कम देण्यात आली होती. एका हस्तकामार्फत आरोपींच्या बँक खात्यात ही रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी नव्याने अटक केलेल्या पाच आरोपींपैकी दोघांनी हत्येपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केली होती. सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७) चेतन दिलीप पारधी (२७) आणि पनवेलमधील राम फुलचंद कानोजिया (४३) यांना अटक केली होती. या आरोपींच्या बँक खात्यात ५ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे त्यांच्या बँक स्टेटमेंटद्वारे स्पष्ट झाले. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे तीन आरोपी प्रथमच या टोळीला भेटले होते. हत्येचा कट रचल्यानंतर मुख्य आरोपी शुभम लोणकर आणि हस्तक मोहम्मद झिशान अख्तर यांनी त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली. या भेटीनंतर हल्लेखोर आणि शस्त्र पुरवणारे आरोपी सातत्याने संपर्कात होते. त्यांनी एकत्र गोळीबाराचा सरावही केला.
आणखी वाचा-‘अल्ट बालाजी’वरील दोन वेबसिरीजप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार
या टोळीचा म्होरक्या नितीन सप्रे आणि राम कनोजिया हे शुभम लोणकरच्या संपर्कात होते. शुभमने त्यांना शस्त्रांची व्यवस्था करण्यास सांगितले. नंतर शुभमने शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांच्यावर गोळीबाराची जबाबदारी सोपवली होती. तिसरा हल्लेखोर गुरमेल सिंहला झिशान अख्तरने पुण्यात पाठवले होते. यावेळी सिद्दीकी यांच्या घराची व कार्यालयाची पाहणी करण्यासाठी सप्रे व कनोजिया यांनी हल्लेखोरांना मदत केली. पाहणी करताना त्यांनी छायाचित्रही काढले. तसेच चित्रफीत बनवून शुभम लोणकरला पाठवले. सुरुवातीला सप्रे व त्याच्या साथीदारांनाच सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी देण्यात येणार होती. पण त्यांनी ५० लाख रुपये मागितल्यामुळे उत्तर प्रदेशातून शिवकुमार व कश्यप यांना बोलवण्यात आले.
सप्रे आणि राम कन्नोजिया हे कुख्यात गुन्हेगार आहेत. नितीन सप्रे, संभाजी परधी आणि चेतन परधी यांनी २०१५ मध्ये सोमनाथ पारधी नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. कारागृहात असताना त्यांची ओळख सोनू कनोजियासोबत झाली. २०१७ मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर हे पाचही गुन्हेगार एकत्र काम करू लागले.
आणखी वाचा-दाऊदने घडविलेल्या जे.जे. गोळीबाराप्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यात डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७) चेतन दिलीप पारधी (२७) आणि पनवेलमधील राम फुलचंद कानोजिया (४३) यांचा समावेश आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकरला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याशिवाय हरिषकुमार निषाद या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. तसेच सिद्दीकी यांच्या सुरक्षेत तैनात पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा तिसरा आरोपी शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.