लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांनी घर खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून भाडेतत्वावर कुर्ल्यामध्ये घर घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्या संकेतस्थळाद्वारे आरोपीनीं एका दलालाशी संपर्क साधला होता.

कुर्ला पश्चिमेकडील पटेल चाळीतील खोली क्रमांक २२५ मध्ये आरोपी वास्तव्यास होते. हत्येपूर्वी १५ दिवसांपासून त्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. संकेतस्थळावरून त्यांनी अब्बास शेख नावाच्या दलालाशी संपर्क साधला होता. दलालांमार्फत दुप्पट भाडे देऊन सप्टेंबरपासून आरोपी येथे वास्तव्यास होते. याप्रकारणी आतापर्यंत २० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. दरम्यान, आरोपीनीं कर्जतमधील खोपोली रोड येथील पळसदरी गावाजवळ बंदूक चालविण्याचा सराव केला होता. त्यांनी सप्टेंबरमध्ये सराव केल्याचे चौकशीत उघड झाले. त्यांनी कर्जत पळसदरीजवळ कुर्ला ते लौजी रेल्वे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यानंतर रेल्वे स्थानकापासून अंदाजे ८ किलोमीटर अंतरावर पळसदरी गावाजवळ जाऊन सराव केला.

आणखी वाचा-बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचा हत्येपूर्वी बिश्नोईच्या भावाशी संपर्क, पोलीस चौकशीत कबुली; नेमकं काय बोलणं झालेलं?

सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. याप्रकारणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट . सर्क्युलर जारी केले आहे. अटक आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधारकार्ड आदी जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपी भगवत सिंह व राम कनोजिया हे दोघेही जुलैमध्ये उदयपूर येथे गेले होते. तेथून आरोपींनी दोन परदेशी बनावटीच्या पिस्तूल आणल्या होत्या. त्यांचा वापर सिद्दीकी यांच्या हत्येसाठी करण्यात आला होता.