मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुजीत सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सिंह कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सिंहच्या सांगण्यावरून याप्रकरणातील अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर व आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केली होती.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३२ वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली आहे. त्याने परदेशातील गुंडासोबत संपर्क साधला होता. सिंह विविध समाज माध्यमातून अनेक खात्यांवर संवाद साधत होता. तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे. सुजीत सिंह मुंबईतील रहिवासी आहे आणि बाबा सिद्दिकीच्या हत्या प्रकरणात त्याचा शोध सुरू होता. पंजाब पोलीस व मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सिंहला लुधियानातून पकडण्यात आले होते. सिंह बाबा सिद्दिकीला मारण्याच्या कटात सहभागी होता. तो पूर्वी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात राहात होता आणि त्याला लुधियानामध्ये अटक करण्यात आली.
हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात घट
याप्रकरणी आतापर्यंत पाच पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मते, सिंहला बाबा सिद्दिकीची हत्या करण्याच्या कटाची माहिती होती आणि तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. त्याने इतर आरोपींना पैसे पुरवले आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यात सहभागी होता. गुन्हा घडण्याच्या आधी एक महिना सिंहने मुंबई सोडली होती.
सिंह बब्बू म्हणून प्रचलित आहे. तसेच तो या प्रकरणातील आरोपी मोहम्मद झिशान अख्तर याच्याशी संपर्क साधत होता. त्यानंतर तो चार ते पाच महिन्यांपूर्वी सप्रे आणि इतर आरोपींशी संपर्कात आला. सिंह विरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. पोलीस त्याबाबत पडताळणी करीत आहेत. याप्रकरणी सिंहला ४ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच हरिशकुमार निषाद याला याप्रकरणी २८ ऑक्टोबरपर्यंत तसेच इतर पाच आरोपींनाही याप्रकरणी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह व प्रवीण लोणकर यांना याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करीत असून याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.