मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारात आणि हत्येच्या कटात सहभागी अनुक्रमे सहभागी गुरमैल सिंह व मोहम्मद झिशार अख्तर यांच्यातील दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी अमित हिसामसिंह कुमार (२९) याला बुधवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायायलयाने त्याला पोलीस कोठडी सुनवली आहे. ही याप्रकरणातील ११ वी अटक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित कुमार हा हरियाणातील कैठाल तालुक्यातील नाथवान पट्टी येथील रहिवासी आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा मोहम्मद झिशान अख्तर याच्या संपर्कात अमित कुमार होता. अख्तरच्या सांगण्यावरून त्याने गुरमैलला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी होण्यास सांगितले होते. त्यासाठी त्याच्यापर्यंत काही रक्कमही पोहोचली असून त्याची तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अमित कुमारवर हरियाणामध्ये चार गुन्हे दाखल असून त्यात मारामारीच्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. आरोपीविरोधात कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हत्येच्या कटातील काही रक्कम आरोपीपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची तपासणी सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आरोपी कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे, त्याचीही तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – झोपु योजना संलग्न करण्याबाबत गोंधळ कायम! नगरविकास विभागाची भूमिका अस्पष्टच

तसेच सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. अटक आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधारकार्ड जप्त करण्यात आली होती. अटक आरोपी भगवत सिंह व राम कनोजिया हे दोघेही उदयपूर येथे जुलैमध्ये गेले होते. तेथून आरोपींनी दोन परदेशी बनावटीच्या पिस्तूल आणल्या होत्या. त्यांचा वापर सिद्दीकी यांच्या हत्येसाठी करण्यात आला. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमैल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. याप्रकारणी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे.

आरोपीच्या बँक खात्यावर रक्कम

झिशान अख्तरची हरियाणातील कैथलमध्ये राहण्याची व्यवस्था, अन्य सुविधा उपलब्ध करण्याची, तसेच पैसा पुरविण्याचे काम अमितने केले होते. कारागृहातून जून २०२४ मध्ये बाहेर आल्यानंतर झिशानने त्याची राहण्याची जागा बदलली. त्याला सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी मिळाल्यानंतर मुळचा जालंधरचा असलेला झिशान हरयाणातील कैथलमध्ये वास्तव्यास आला. तेथे एका मित्राच्या माध्यमातून झिशान आणि अमित एकमेकांच्या संपर्कात आले. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याबाबत दोघांमध्ये बोलणे झाल्यानंतर अमितने हरियाणातील कैथलमध्ये झिशानची राहण्याची व्यवस्था केली. शिवाय अन्य सुविधाही पुरविल्या. इतकेच नाही तर झिशानने अमितच्या बँक खात्यावर पैसे मागवून घेतले होते. त्यानुसार अमितने त्याच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर आठ वेळा पैसे काढून ते झिशानला दिले होते. त्यातील काही रक्कम वेगवेगळ्या मार्गाने झिशानने पुण्यात प्रवीण लोणकरपर्यंत पोहचविल्याचे चौकशीत उघड झाले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सर्व कल्पना अमितला होती. सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात अमितही सहभागी होता. त्यामुळे अमितच्या माध्यमातून बऱ्याच बाबींचा उलघडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : वाझे यांना माफीचा साक्षीदार होऊ देण्यास विशेष न्यायालयाचा नकार

अख्तर एकदाही मुंबईत आला नाही

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट झिशान अख्तरद्वारे शिजला. झिशानने वेगवेगळ्या माध्यमातून हत्येचा कट पूर्णत्वास नेला. मात्र झिशान एकदाही मुंबईत आला नाही. हत्येपूर्वी आठ दिवस आधी झिशानने कैथलमधून काढता पाय घेतला. त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

दारूचा व्यवसाय, १२ वीपर्यंत शिक्षण

हरयाणातील कैथलमध्ये राहणाऱ्या अमितवर चार ते पाच गुन्ह्यांची नोंद आहे. अमित तेथील कारागृहात होता. १२ वीपर्यंत शिकलेला अमित तेथे दारूचा अड्डा चालवायचा. एका मित्राच्या माध्यमातून अमित गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या झिशानच्या संपर्कात आला. मग त्याने झिशानला कैथलमध्ये आसरा देऊन सर्व सुविधा पुरविल्या होत्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique murder case link between conspirator and shooters in hands of police one person arrested from haryana mumbai print news ssb