मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी त्यांचे घर व कार्यालयाची मारेकऱ्यांनी महिनाभर पाहणी केली, त्यावेळी सिद्दिकी नेहमी कार्यालयापासून काही अंतरावर मोटरगाडी उभी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मारेकऱ्यांनी सिद्दिकी यांना कार्यालयाजवळच मारण्याचे ठरवले. याप्रकरणी आतापर्यंत ५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समजल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्ल्यातील पटेल चाळ येथे हल्लेखोर धर्मराज कश्यप, शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम व गुरमेल सिंह राहत होते. सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पुण्यात प्रवीण लोणकर, शुभम लोणकर व मोहम्मद झिशान अख्तर यांच्याशी झालेल्या बैठकीत शिजला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून नियमित वांद्रे परिसरात सिद्दिकी यांचे घर व कार्यालयाची पाहणी करायचे. हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबरला तासभर आधी हल्लेखोर वांद्रे पूर्व येथे पोहोचले होते. याशिवाय पाहणी करण्यासाठी वापरलेली दुचाकी आरोपींनी ३२ हजार रुपयांना पुण्यातून खरेदी केली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समजले आहे. ती सर्व रक्कम रोखीने आरोपींना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.

हेही वाचा : “जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!

याप्रकरणी घटनास्थळाजवळून पोलिसांना एक काळ्या रंगाची बॅग सापडली होती. त्यात पिस्तूल, एक आधार कार्ड आणि शर्ट होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा हल्ला करण्यापूर्वीच घरातून पळून गेला. तसेच मोहम्मद झिशान अख्तर हादेखील हल्ल्याच्या दिवशी मुंबईत नव्हता. पण तो मोबाइलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती आरोपींनी चौकशीत दिली आहे.

दरम्यान, अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहेत. अटक आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधार कार्ड जप्त करण्यात आले होते.

हेही वाचा : नववी, दहावीला १५ विषयांचा अभ्यास

लुक आऊटसर्क्युलर जारी

गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique murder till now 5 lakh rupees transactions regarding murder reveled in investigation mumbai print news css