काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला आहे. एक्सवर पोस्ट करुन बाबा सिद्दीकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे मुंबईतले बडे नेते आहेत. सिनेमा विश्वातल्या लोकांशी त्यांची खास ओळख आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातालं भांडण मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आता याच बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला राम राम केला आहे. एक पोस्ट लिहून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे बाबा सिद्दीकींची पोस्ट?
मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या ४८ वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवा मी थांबवतो आहे. कारण आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तातडीच्या प्रभावाने मी हा राजीनामा दिला आहे. खरंतर मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण म्हणतात ना काही गोष्टींबाबत शांत राहिलेलं बरं. त्यामुळे मी शांत आहे. मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अशी पोस्ट लिहून बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला राम राम केला आहे.
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधले मोठे नेते म्हणून ओळखले जातात. १९७७ मध्ये महाविद्यालयात असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विद्यार्थी दशेत असताना अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग घेतला. मुंबईतल्या एमएमके महाविद्यालयात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे. बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ आणि २००९ या वर्षांमध्ये सलग तीनवेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. मास लीडर अशी त्यांची ओळख आहे.
हे पण वाचा- सिद्दीकी पिता-पुत्रांच्या अजित पवार गटातील प्रवेशाची चर्चा; आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले, “होय, आम्ही दादांना…”
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
आमच्यासाठी हा काही धक्का वगैरे काही नाही. राष्ट्रवादी फुटल्यावर, शिवसेना फुटल्यावर जसं कुणाला आश्चर्य वाटलं नाही तसं आम्हाला बाबा सिद्दीकी पक्षातून गेल्याचं आश्चर्य वाटलं नाही. बाबा सिद्दीकींना मोठं घबाड मिळत असेल आणि केलेल्या पापांमधून, सुरु असलेल्या चौकशीतून मुक्तता मिळत असेल तर ते पक्ष सोडणारच. त्यांना मी शुभेच्छा देतो असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबा सिद्दीकी अजित पवारांबरोबर म्हणजेच भाजपाबरोबर जात आहेत. त्यांनी पक्ष सोडला याचं आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.