Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईत हत्या झाली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या हत्याप्रकरणी पोलिसांनी देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून १० आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच या प्रकरणी तपास करताना बिश्नोईच्या साथीदारांपर्यंत पोहोचणारे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांनी (शूटर्स) त्यांची हत्या करण्याआधी तुरुंगात असलेल्या गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाशी संपर्क साधला होता. बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई हा सध्या कॅनडात वास्तव्यास आहे. मारेकऱ्यांनी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपद्वारे बिश्नोईच्या भावाशी संपर्क साधला होता. अनमोलनेच मारेकऱ्यांना बाबा सिद्दिकी व त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी या दोघांचे फोटो पाठवले होते.

पोलिसांनी काय सांगितलं?

मुंबई क्राइम ब्रँचने मारेकरी व बिश्नोईच्या भवाचं संभाषण मिळवलं आहे. तसेच गुरमेल सिग व धर्मराज कश्यप हे दोन संशयित मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, तिसरा मारेकरी शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. तोच मुख्य मारेकरी होता असं पोलीस तपासांत समोर आलं आहे. यासह या प्रकरणातील इतर सात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सध्या गुरमेल व धर्मराज यांची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा >> एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज दाखल गुन्हा प्रकरण

पोलीस म्हणाले, दोन गटांनी मिळून हे हत्याकांड केलं आहे. यापैकी एक गट म्हणजे ज्यांनी शस्त्रपुरवठा केला आणि दुसरा गट म्हणजे ज्यांनी हत्या केली. आता हत्या प्रकरणाशी संबधित तिसऱ्या गटाच्या मुसक्या आवळल्या जातील. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भंगार पुरवणाऱ्या भगवंत सिंगलाही अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (२१ ऑक्टोबर) एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. या आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे.