Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात चार आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना त्यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ हल्लेखोरांनी गाठलं. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाले. ज्यातल्या दोन हल्लेखोरांना पोलिसांनी पाठलाग करुन आणि जिवाची बाजी लावून अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. या चारही आरोपींना आता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत आज संपली. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यांना न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भंगार पुरवणाऱ्या भगवंत सिंगलाही अटक

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. या आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे.

हे पण वाचा- Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांकडे सापडलेल्या फोटोने खळबळ,’हे’ होतं हत्येचं कारण?

भगवंत सिंगला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

भगवंत सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भगवंत सिंगने आरोपींना पुरवलेले शस्त्र कोठून आणले होते? त्याने ते शस्त्रे कसे पुरवले? तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता का? अशा सर्व गोष्टीचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, भगवंत सिंग हा भंगार विक्रेत्याचं काम करत होता, अशीही माहिती समोर येत आहे.

आरोपींकडून स्नॅपचॅटचा वापर

या प्रकरणातील आरोपींनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केला होता. तसंच, बाबा सिद्दिकींच्या हत्येतील आरोपीच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दिकींचा फोटो आढळून आल्याचं वृत्त समोर आलं. हे छायाचित्र आरोपींसोबत त्यांच्या हँडलरने स्नॅपचॅटद्वारे शेअर केले होते. गोळीबार आणि कट रचणाऱ्यांनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केल्याचे तपासात उघड झालं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी याआधी दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique shot dead at bandra mumbai four accused police custody till october 25 scj