Baba Siddique Shot Dead in Bandra: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बाबा सिद्दिकी हे या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात दाखल झाले होते. आज संध्याकाळी मुंबईच्या वांद्रे भागात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यासंदर्भात पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

बाबा सिद्दिकी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. या हल्ल्यात एक गोळी त्यांच्या सहकाऱ्यालाही पायाला लागली. यानंतर या दोघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, बाबा सिद्दिकींचा मृत्यू झाल्याचं आता लीलावती रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असं आता सांगितलं जात आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

बाबा सिद्दिकींवरील गोळीबारासंदर्भात मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, बाबा सिद्दिकींवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडण्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

हरियाणा-उत्तर प्रदेशचं कनेक्शन?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून त्यात ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोरांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा असल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय, तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे उत्तर भारतातील मोठ्या गँगचा हात असल्याचा संशय आता यातून व्यक्त होऊ लागला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique shot dead in bandra mumbai police detained two people pmw