Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १२ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहितीही समोर आली. कारण बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर दोन हल्लेखोरांना पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे.

१२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता बाबा सिद्दीकींची हत्या

१२ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोर आले त्यांनी गोळ्या झाडल्या. ज्यानंतर बाबा सिद्दीकी कोसळले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दकींवर गोळ्या झाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना पकडणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे यांचं नाव समोर आलं आहे.

राजेंद्र दाभाडे यांनी दोन मारेकऱ्यांना कसं पकडलं?

राजेंद्र दाभाडे यांनी बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना पकडलं. राजेंद्र दाभाडे यांच्या धाडसाचं कौतुक होतं आहे. कारण दाभाडे यांनी धावत जाऊन या गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडलं. निर्मल नगर पोलीस ठाण्यात राजेंद्र दाभाडे एपीआय पदावर कार्यरत आहेत. दसऱ्याचा दिवस होता आणि विसर्जन मिरवणूक निघाली होती त्यामुळे राजेंद्र दाभाडे बंदोबस्त पाहात होते. बाबा सिद्दीकींना गोळ्या लागल्याचं कळताच राजेंद्र दाभाडे हल्लेखोरांना पकडण्यासाठी धावले. आरोपींच्या हातात बंदुका होत्या. पण जिवाची पर्वा न करता राजेंद्र दाभाडे यांनी या दोघांना पकडलं. तसंच आरोपींच्या हातात असलेल्या बंदुकाही हिसकावून घेतल्या. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तुरुंगात रचला! रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या आणि.. आत्तापर्यंत काय काय घडलं?

राजेंद्र दाभाडे यांनी जिवाची पर्वा न करता दोघांना केली अटक

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे, उप निरीक्षक शैलेश चौधरी आणि सुदर्शन बांकर, विशाल पालांडे हे सगळे आरोपींना पकडायला धावले. यांच्यासह कॉन्स्टेबल्स संदीप आव्हाड, किरण शेलार, संग्राम आठीग्रे हे सगळे होते. आरोपींनी गोळीबार केला आणि त्यानंतर ते पार्कमध्ये पळाले. पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पार्कमध्ये पळत जात जिवाची बाजी लावून दोन आरोपींना पकडलं. या प्रकरणी डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले की बाबा सिद्दीकींची हत्या केल्यानंतर मारेकरी जेव्हा पळाले तेव्हा आमच्याच अधिकाऱ्यांनी त्यातल्या दोघांना तातडीने अटक केली. या दोघांकडून दोन पिस्तुलं आम्ही जप्त केली आहेत.