Baba Siddique Shot Dead Breaking News: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. तीन अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर सिद्दीकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे असल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. पोलिसांनी रात्री मारेकऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीटीव्हीने दोन्ही मारेकऱ्यांच्या पार्श्वभूमीबाबत बातमी दिली आहे. कर्नेल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या २५-३० दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते.

हे वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, गोळीबार नेमका कसा झाला? वांद्र्याच्या सिग्नलवर नेमकं काय घडलं?

सिद्दीकी यांची हत्या कशी झाली?

दसऱ्याच्या दिवशी खेरवाडी, वांद्रे सिग्नल येथे देवींच्या विसर्जनाची मिरवणूक निघत असते. त्यामुळे या परिसरात दसऱ्याला गर्दी असते. सिद्दीका यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे. त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी बाबा सिद्दीकी पायी निघाले होते. यावेळी ६६ वर्षीय सिद्दीकी यांच्यावर रात्री ९.३० वाजता गोळीबार झाला. ९.९ एमएम पिस्तूलमधून सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे गोळी लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले.

यावेळी सिद्दीकी यांच्या गाडीलाही काही गोळ्या लागल्या. ज्यामुळे तीनहून अधिक गोळ्या झाडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांना आणखी तीन गोळ्यांची काडतुसे मिळाली आहेत. कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यपला पोलिसांनी अटक केली असली तिसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर राजकारण आणि मुंबईच्या बॉलिवूड क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या पक्षात गेलेले बाबा सिद्दीकी यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. तसेच ईदनिमित्त ते आयोजित करत असलेली ईफ्तार पार्टीही बरीच प्रसिद्ध होती. या ईफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते, राजकारणी सहभागी होत असत.

अजित पवार यांनी काय म्हटले?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठे नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique shot dead shooters claim to be from lawrence bishnoi gang kvg
Show comments