Baba Siddique Shot Dead News Update: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली गेली. शनिवारी रात्री ते वांद्रे पूर्वचे आमदार आणि मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला.

६६ वर्षीय बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यावसायिक होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन मारेकऱ्यांना अटक केली. हे दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तत्पूर्वी पोलिसांनी विविध अंगानी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागे वैयक्तिक शत्रूत्व किंवा राजकीय कारण होते का? याचाही तपास केला जात आहे. तसेच बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते, त्यामुळे बिश्नोई गँगचा या गोळीबारात सहभाग होता का? हाही तपास केला जात आहे.

हे वाचा >> बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

दोन आरोपींची माहिती आली समोर

कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रात्री मारेकऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले. एनडीटीव्हीने दोन्ही मारेकऱ्यांच्या पार्श्वभूमीबाबत बातमी दिली आहे. कर्नेल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या २५-३० दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते.

डॉक्टर काय म्हणाले?

बाबा सिद्दीकींना लिलावती रुग्णालयात आणल्यानंतर काय घडले याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, “रात्री ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणले गेले. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हते. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावे यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केले” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.

हे ही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही कुणालाही…”

कोण होते बाबा बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ आणि २००९ मध्ये असे सलग तीन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली. मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते विधानसभेत हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिशान सिद्दीकी याला वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.

Story img Loader