Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला आहे. आज सायंकाळीच त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचंही बघायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळी बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सलमान खान, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते याठिकाणी दाखल झाले होते. तसेच नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा – Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश!

शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तिघांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर चार ते पाच राऊंड फायर केले. यापैकी दोन राऊंड बाबा सिद्दीकी यांच्या छाती आणि पोटावर लागले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात त्यांच्या एका सहकाऱ्यांच्या पायालाही गोळी लागली होती.

दोघांना अटक, एका पोलीस कोठडी

याप्रकरणी गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी गुरुमीत सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्याचे निर्देश दिले. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी घेतली होती? पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती!

सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित

याप्रकरणातील सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे जण फरार आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांकडून १० पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार तसेच मोहम्मद जीशान अख्तर असं फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैक मोहम्मद जीशान अख्तर हा ७ जून रोजी पटियाला तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे. पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांच्या संपर्कात आला होता. मोहम्मद जीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddiqui cremated with state honors at bada kabristan spb