राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे. अजित पवार यांनी त्यांचे उद्याचे कार्यक्रमदेखील रद्द केले आहेत.
बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कोण होते बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.