मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी आरोपी शुभम लोणकर याने झारखंड येथील नक्षलवादी परिसरात प्रशिक्षण घेतल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्याशिवाय अन्य दोन आरोपी रूपेश मोहल आणि गौरव अपुने यांनाही शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तपास पथक या माहितीची पडताळणी करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुन्हे शाखेने या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावला आहे. याप्रकरणातील १३ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच, गुन्हे शाखा या प्रकरणातील अन्य पाच संशयित आरोपींच्या कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी शुभम लोणकर याने झारखंड येथील गुमला परिसरात प्रशिक्षण घेतले आहे. हा परिसर नक्षलग्रस्त आहे. त्या परिसरात नक्षलवादी रायफलचा वापर करत असल्यामुळे त्याने नक्षलवाद्यांसह प्रशिक्षण घेतल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. या माहितीची पोलीस पडताळणी करत आहेत. शुभम याप्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असून तो बाबा सिद्दीकी हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>>नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याने सर्व आरोपींशी संपर्क तोडले. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. शुभमला अटक करण्यासाठी पोलिसांना याप्रकरणातील पाच आरोपींचा ताबा पुन्हा घेण्याची शक्यता आहे.

याप्रकरणात शिवकुमार गौतम तसेच हरिशकुमार निशाद (२६), नितीन सप्रे (३२), राम कानोजिया (४३), संभाजी पारधी (४४), चेतन पारधी (२७), प्रदीप ठोंबरे (३७), भगवंतसिंग ओमसिंग (३२), अमित कुमार (२९), रुपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९), शिवम कोहाड (२०) आणि सुजित सिंग (३२) यांच्या सह एकूण २६ जणांना अटक केली आहे. संशयितांविरुद्ध आरोप अधिक मजबूत करण्यासाठी मोक्का कायदा लागू करण्यात आला आहे. तपास सुरू असून पोलीस सिद्दीकी यांच्या हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईसह तिघांचा सहभाग उघड झाला असून त्यांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. त्यात शुभम लोणकर व झिशान मोहम्मद अख्तर याचा सहभाग आहे. याप्रकारणी पंजाबमधून अटक करण्यात आलेला सुजीत सुशील सिंह हा कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे याप्रकरणी अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सिंहच्या सांगण्यावरून याप्रकरणातील अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर व आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddiqui murder case accused suspected of training in naxal affected areas mumbai print news amy