मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड आकाश चौहानच्या सहभागाबाबत सध्या गुन्हे शाखा तपास करीत आहे. या संपूर्ण हत्येचा कट रचणाऱ्या मोहम्मद झिशान अख्तरला याप्रकरणात सहभागी करण्यासाठी चौहानचा मोठा सहभाग असल्याचा संशय आहे. पटियाला तुरुंगात असताना अख्तर चौहानच्या संपर्कात होता. याप्रकरणी गुन्हे शाखा चौहानचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौहान अनेक वर्षांपासून बिश्नोई टोळीसाठी काम करीत आहे. यापूर्वीही लॉरेन्स बिष्णोई टोळीने घडवून आलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचण्यासाठी अनमोल बिष्णोईला विश्वासू व्यक्ती हवा होता. त्यात चौहानच्या संपर्कात आल्यामुळे अख्तर त्याचा विश्वासू बनला होता. तसेच त्यावेळी तो ७ जूनला कारागृहातून सुटत असल्यामुळे चौहानच्या सांगण्यावरूनच अख्तरला याप्रकरणात सहभागी करण्यात आले. त्याला चांगली रक्कम देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने सिद्दीका यांच्यावर झालेल्या गोळीबारात सहभागी गुरमैल सिंहशी संपर्क साधला. त्यानेच सिद्दीकी यांच्या हत्येसाठी तीन हल्लेखोर तयार केले. मुंबईत त्यांची राहण्याची व त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. याप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली असून कटात सहभागी अख्तर आणि शुभम लोणकर यांचा शोध सुरू आहे. ते एकत्र लपले असण्याची शक्यता असून याप्रकरणी नुकताच मोक्का कायदा लागू करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोल बिष्णोई सध्या अमेरिकेतील तुरुंगात असून त्याला भारतात आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलीस प्रयत्न करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddiqui murder case lawrence bishnoi gang key goon suspected of involvement mumbai print news amy