मुंबईः कुर्ल्यातील पटेल चाळीतील सर्वांशी आदराने वागणारे तरुण हे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे हल्लेखोर निघाल्यामुळे सर्वच रहिवाशांना धक्का बसला आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे शिवकुमार, धर्मराज कश्यप व गुरमेल सिंह तिघेही २ सप्टेंबरपासून तेथे भाडेतत्त्वावर राहात होते. पोलिसांनी त्या घराला टाळे लावले असून घरातील सामानही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
कुर्ला पश्चिमेकडील पटेल चाळीतील खोली क्रमांक २२५ मध्ये ही मंडळी राहण्यास होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांची ये जा वाढल्याचे शेजारच्यांचे म्हणणे आहे. घर मालकाला दलालांच्यामार्फत दुप्पट भाडे देऊन सप्टेंबरपासून ते तेथे वास्तव्यास होते. वृत्तवाहिनीवर आरोपींचे छायाचित्र पाहून तेथील रहिवाशांना धक्का बसला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यातील गुरुमेल अनेकदा परिसरात सिगारेट पित मोबाईलवर बोलत फिरायचा. यावेळी शेजाऱ्यांच्या पाळीव कुत्र्याशीही खेळायचा. तसेच लहान मुलांशी इंग्रजीत बोलायचा. चेहऱ्यावरून सर्वजण सधन कुटुंबातील वाटत असल्याने त्यांच्याबाबत कधी संशय आला नाही, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – मुंबई : राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ-मरोशीतील पुनर्वसनासही विरोध
हेही वाचा – मुंबई : शिवडी क्षयरोग रुग्णालयात सुरू होणार आयआरसीयू विभाग
आरोपींच्या घराला आता टाळे आहे. खिडकीतून घरातील अस्ताव्यस्त पडलेले सामान दिसते. गाद्या, कपडे तसेच चपलाही घरातच सोडलेल्या आहे. पाण्यासह शीतपेयाच्या रिकाम्या पडलेल्या बाटल्या खोलीत पसरलेल्या आहेत. मारेकरी त्याच ठिकाणी राहण्यास असल्याचे समजताच आजूबाजूच्या शेजारच्या परिसरातील मंडळीनी देखील परिसरात गर्दी केले होती.