मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले रम्य आणि देखणे शिवालय म्हणजे बाबूलनाथ. मलबार हिल टेकडीवर वसलेले हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक वारसा. भक्तगणांचा सतत येथे वावर असतो. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या धार्मिक दिवशी येथे भाविकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात.
गिरगाव चौपाटीजवळून जाणाऱ्या बाबूलनाथ रोडवरून या मंदिराकडे जाता येते. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तत्पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी लागणारे प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर आहे. काळय़ा पाषाणातील या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
या मंदिराचे नाव बाबूलनाथ का पडले याबाबत बऱ्याच आख्यायिका आहे. मात्र या टेकडीवर बाभळीचे झाड होते, या झाडाखालीच हे मंदिर बांधण्यात आल्याने बाबूलनाथ असे बोलले जाते. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. त्याकाळी येथे छोटेखानी मंदिर होते, मात्र काळाच्या ओघात ते जमिनीत गाडले गेले. १८व्या शतकात येथे उत्खनन करण्यात आले आणि तिथे काळय़ा दगडातील शिवलिंग आणि मारुती, गणपती, पार्वती यांच्या मूर्ती सापडल्या. तिथे आणखी एक पाचवी मूर्ती सापडली होती, मात्र उत्खननादरम्यान ती भंग पावल्याने तिचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
१७८०मध्ये या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर बांधण्याच्या वेळी ही जागा मुंबईतील पारशी समुदयाकडे होती. पारशी समुदयाचा मंदिर उभारण्यास तीव्र विरोध होता. शेवटी न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर या मंदिराचा मार्ग मोकळा झाला.
१८९०मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि काही गुजराती व्यापाऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे मुंबईतील उंच शिवमंदिर म्हणून या मंदिराची ख्याती वाढली आणि भाविकांची गर्दी होऊ लागली. आजही दर सोमवारी या मंदिरात भक्तगणांचा ओघ वाढलेला असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा