२४ आठवडय़ांत जन्मलेला होशांग ठणठणीत !
मातेच्या गर्भात आवश्यक ती वाढ होण्यापूर्वीच म्हणजे अवघ्या २४ व्या आठवडय़ातच होशांगचा जन्म झाला. मुदतपूर्व प्रसूतीमुळे साहजिकच त्याची वाढ पूर्ण झाली नव्हती. अशा परिस्थितीत त्याला जगवण्याची जिद्द असलेल्या त्याच्या माता-पित्यांसोबत तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू उभा राहिला आणि आज होशांग दोन वर्षांचा असून तो शाळेतही जाऊ लागला आहे.
सचिन निवृत्त होणार म्हणून त्याचा अखेरचा सामना पाहण्यासाठी सचिनचा स्वीय साहाय्यक रमेश पारधे आणि त्याची सीए पत्नी पिंकी हे दोघे गेले होते. सामना संपतो ना संपतो तोच राष्ट्रपती भवनातून सचिनला भारतरत्न जाहीर केल्याचा दूरध्वनी रमेश यांना आला. सचिनची शेवटची खेळी संपतानाच त्याला बहाल झालेल्या सर्वोच्च सन्मानामुळे खूप आनंद होता. मात्र, त्याच दिवशी साडेपाच महिन्यांची गर्भवती असलेल्या पिंकीच्या गर्भातील जल बाहेर येऊ लागले.तिला तत्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. गर्भधारणा होऊन २३ आठवडेच झाले होते. तिच्या पोटात असलेल्या फायब्रॉइडच्या गाठींमुळे गर्भधारणेत अडचण येईल, असे वाटले नव्हते. मात्र, त्या गाठीच बाळाला बाहेर ढकलत असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी किमान २५ आठवडय़ांपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला. मात्र, रात्री प्रसवकळा सुरू झाल्या आणि पहाटे ४.३०च्या सुमारास त्यांना पुत्ररत्न झाले. जेमतेम २४ आठवडे मातेच्या गर्भात राहिलेल्या ७८० ग्रॅमच्या मुलाचा जन्म झाला. बाळाचे अनेक अवयव पूर्णपणे विकसित झाले नव्हते. त्याला तातडीने नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात हालविण्यात आले. रुग्णालयातील डॉ. राहुल वर्मा यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यावर सर्व उपचार होईपर्यंत तब्बल ८४ दिवस तो रुग्णालयात होता. हा संपूर्ण काळ मी व माझी पत्नी रुग्णालयातून बाहेरच पडलो नसल्याचे रमेश सांगतात. उपचार सुरू होताना तीन वेळा तो आता शेवटचा श्वास घेणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्याला जगवण्याची आमची प्रबळ इच्छाशक्ती होती. डॉक्टरही त्याच्यावर त्या पद्धतीने उपचार करत होते आणि कदाचित त्याचीही जगण्याची इच्छा असेल म्हणूनच तो मृत्यूच्या दारातून परत येत होता. घरी त्याच्यासाठी स्वतंत्र खोली करण्यात आली.तीन महिने त्याला या खोलीत ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. फिजिओथेरपीद्वारे त्याची हाडे मजबूत करण्यासाठी डॉ. स्नेहल देशपांडे यांच्याकडे उपचार सुरू करण्यात आले. बोलण्यासाठीही उपचारपद्धतीचा वापर केल्याने तो चांगले बोलूही लागल्याचे आई पिंकी सांगते.
* जन्मावेळी होशांगच्या डोळय़ांच्या नसा अतिरिक्त होत्या. प्रतिकारशक्तीचाही अभाव होता.
* फुप्फुस सक्षम करण्यासाठी इंजेक्शनचा वापर करण्यात आला.
* लेझर तंत्राने डोळय़ांच्या अतिरिक्त नसा काढून टाकण्यात आल्या.
* तब्बल ८४ दिवस होशांग रूग्णालयातच होता.
होशांगचे प्रकरण तसे दुर्मीळ होते. यामुळे आमच्यासाठीही ते एक आव्हान होते. होशांगवर रुग्णालयातील उपचारानंतर घरी फिजिओथेरपीसारखे उपचार केले आणि होशांग बरा झाला. देशातील वैद्यकीय विम्यातही मुदतपूर्व प्रसूतीसाठी सुविधा नाही, याची खंत आहे.
– डॉ. राहुल वर्मा, बालरोगतज्ज्ञ