सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली ६१ वर्षीय व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शशीकला उर्फ बेबी पाटणकर व परशुराम मुंडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे. कफपरेड येथील रहिवासी असलेले तक्रारदार किरीट चौहान (६१) हे रुनिचा फ्रेंच फॉरवर्डचे मालक आहे. किरीट यांनी सोने खरेदी- विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी त्यांनी आपल्या काही मित्रांना या क्षेत्राशी संबंधित लोकांना संपर्क करण्यास सांगितले होते.

हेही वाचा >>> करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण : सुजीत पाटकरसह सहा जणांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये देवकुमार रॉय नावाच्या व्यक्तीने त्यांची सुनीता चौधरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. चौधरीमार्फत ते परशुराम रामकिशन मुंडेच्या संपर्कात आले. मुंडेने चौहान यांना, तो मेसर्स आरआरएम गोल्ड ट्रेडिंग कंपनीचे संचालक असून त्यांची कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

हेही वाचा >>> महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून संभाजी भिडेंविरुद्ध न्यायालयात दावा

वरळी नाक्याजवळील भिवंडीवाला चाळीतील पहिल्या मजल्यावरील बेबी पाटणकरच्या घरी सोने दाखवण्यासाठी बोलावले. तेथे बेबीशी ओळख करून देत, तिच्याकडे पाच किलो सोने असल्याचे सांगितले. तसेच, बेबीला पाच वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. चौहानने तीन किलो सोन्यासाठी १ कोटी २७ लाख रुपये दिले. दुसऱ्या दिवशी ७० लाख बेबी पाटणकरला दिले. बेबीने सोने घेऊन येते सांगून त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र ती आली नाही. दुसऱ्या दिवशी झवेरी बाजारात सोने घेण्यास बोलावले. तेथेही बेबी आली नाही. चौहानने मुंडेकडे जाब विचारताच त्याने बेबीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावताच बेबी पैसे देत नसल्याचे सांगून विसरून जाण्याचा सल्ला दिला. अखेर, चौहान यांनी गुन्हे शाखेत धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

Story img Loader