मुंबई : पदपथावर आईच्या कुशीत झोपलेल्या दीड वर्षाच्या बाळाच्या अंगावरून भरधाव वेगाने जाणारी मोटरगाडी गेल्याची हृदयद्रावक रविवारी वडाळ्यात घडली. या अपघातात बाळाचा मृत्यू झाला असून त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी मोटरगाडी चालक कमल विजय रिया (४६) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अपघातात वरदान लोंढे या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई प्रिया लोंढे (२९) जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या वडाळा गाव येथील गारोडी समाज झोपडपट्टीत पती आणि दोन मुलांसह राहतात. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लहान मुलगा वरदान याला घेऊन त्या घरासमोरील पदपथालगत झोपी गेल्या. त्यानंतर जोरदार आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिक धावत आले. त्यावेळी प्रिया लोंढे यांनी उठण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना उठता येत नव्हते. काही वेळाने अंगावरून मोटरगाडी गेल्याचे समजताच हंबरडा फोडला. काही वेळाने मोटरगाडीने चिरडल्यामुळे आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे महिलेला समजले. याप्रकरणाबाबतची माहिती महिलेकडून घेण्यात आली आहे. त्यात अपघातग्रस्त मोटरगाडी उद्योग भवनच्या दिशेने येत होती. वाहतुकीच्या विरुद्ध बाजूने त्यांच्या अंगावरून गाडी गेली. जमलेल्या नागरिकांनी कार चालक महिलेला अडवून ताब्यात घेतले. केलेल्या चौकशीत कमल विजय रिया (४६) असे महिलेचे नाव असून ती वडाळा भव्य हाईट्स येथील रहिवासी असल्याचे समजले.

दुसरीकडे मुलगा काहीही हालचाल करत नसल्याने लोंढे यांच्या नातेवाईकांननी बाळाला जवळच्या रुग्णालयात नेले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरएके मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रात्री १ च्या सुमारास मुलाला मृत घोषित करण्यात आले. पुढील उपचारासाठी महिलेला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे क्ष-किरण चाचणीत महिलेचा खांद्याचे हाड मोडल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी भरधाव वेगाने मोटरगाडी चालवतून बाळाच्या मृत्यूला कारणभूत ठरल्याप्रकरणी चालक महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby sleeping in mother lap was died case registered against motor vehicle driver mumbai print news ssb