गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. मात्र, अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आनंदाचा शिधा लोकांना नाही, तर आमदारांना खोक्यात मिळतो, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केली होती. दरम्यान यावरून बच्चू कडू यांनी राऊतांनां खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात धमक्यांचे तीन फोन आल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू
काय म्हणाले बच्चू कडू?
राज्य कोणाचंही असलं तर गरिबांचं आयुष्य कडूच आहे. आपल्या देशात उपाशी झोपणारा आणि तुपाशी खाणारा, असे दोन वर्ग आहे. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी तुपाशी खाणाऱ्या लोकांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गरिबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार विरोधाकांना नाही. सत्तेच्या बाहेर आले की त्यांना उपाशी लोकांची आठवण येते आणि सत्तेत आल्यावर तुपाशी असलेल्या माणसांशी रोज भेटीगाठी होतात, त्यातला हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
”त्या’ टीकेवरून संजय राऊतांना लगावला टोला
दरम्यान, संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या आनंदाच्या शिधासंदर्भात केलेल्या टीकेबाबत विचारलं असता, राऊतांच्या स्वप्नात रोज खोके येतात. त्यांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणे गरजं आहे, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांना आनंदाचा शिधा मिळत नसल्याच्या तक्रारींबाबत विचारलं असता, अनेकांना दिवाळीचा शिधा अद्याप मिळालेला नाही. शिधा हा फक्त खोक्यात आमदारांना मिळतो. तो गरिबांना मिळत नाही, असे ते म्हणाले होते.