अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं वक्तव्य केलं. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गोंधळ झालेला पाहायला मिळाला. तसेच बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी पुढे आली. या वादानंतर आता बच्चू कडू यांनी याबाबत माफी मागितली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
बच्चू कडू म्हणाले, “नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेल, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो.”
आसाम विधानसभेत नेमकं काय घडलं?
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे आसामच्या विधानसभेतील वातावरण तापलं. आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “आसामबद्दल इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आसाममधील विरोधी पक्षातील आमदारांनी हे वक्तव्य करणाऱ्या बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली.
हेही वाचा : भटक्या कुत्र्यांबाबत बच्चू कडूंचा सरकारला अजब सल्ला; गुवाहाटीचा उल्लेख करत म्हणाले…
बच्चू कडू काय म्हणाले होते?
अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले होते, “महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली.”