पहिल्या वर्षांत रिक्त जागांवर प्रवेश शक्य, नव्या नियमांची घोषणा लवकरच
सामायिक प्रवेश चाचणीत (सीईटी) अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाची संधी हुकलेल्या, परंतु पुढे विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग पहिल्या वर्षांपासूनच खुला करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पदविकाधारकांनाही पहिल्या वर्षांपासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या पदवी (विज्ञान) आणि पदविकाधारकांना (अभियांत्रिकी) प्रवेशासाठी सीईटीतून सूट मिळणार आहे. अर्थात सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरच रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
पदविकाधारकांबरोबरच बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय असलेले व पुढे विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांला प्रवेश मिळणार आहे. त्यांनाही पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सीईटीतून सूट दिली जाणार आहे. या संबंधीचे नियम लवकरच जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क विनिमयन) कायद्यातील तरतुदीनुसार २०१६-१७ साठी प्रवेश नियम करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करताना त्यात काही त्रुटी आढळून आल्या. त्यासंदर्भात विद्यार्थी, पालक व शिक्षण संस्थांच्याही काही तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन त्या त्रुटी दूर करण्यासाठी या नियमांमध्ये तशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.
अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेश सीमॅट, कॅटमधून
पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०१८-१९ पासून अखिल भारतीय कोटय़ातील एमबीएचे प्रवेश सीमॅट, कॅट व राज्य शासनाच्या सीईटीमार्फत दिले जातील. त्यामुळे खासगी सीईटीतून प्रवेश करणे बंद केले जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सूत्राकडून सांगण्यात आले. खासगी क्षेत्रात झटपट नोकरी मिळण्यासाठी व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीचे (एमबीए) शिक्षण घेण्याकडे हल्ली विद्यार्थ्यांचा कल आहे. राज्यात एमबीए अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या ३७६ खासगी संस्था आहेत. राज्य सरकारच्या फक्त दोनच संस्था आहेत. दर वर्षी साधारणात २७ हजार विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. तरीही गेल्या वर्षी १४ हजारांहून अधिक जागा शिल्लक राहिल्या होत्या, अशी माहिती मिळते. एमबीएच्या प्रवेश परीक्षाही स्वतंत्रपणे घेतल्या जातात.
झाले काय?
सध्या पदविका (अभियांत्रिकी) आणि पदवीधारकांना (विज्ञान) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेता येतो. मात्र, दुसऱ्या वर्षांकरिता जागांची संख्या कमी असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर या बाबतचे अंतिम नियम तयार करण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.