भारतीय रेल्वेच्या हायस्पीड कॉरीडॉरच्या उभारणीत आणि स्थानकांच्या विकासामध्ये चीनने आपले तंत्रज्ञान वापरण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या सहा हायस्पीड कॉरीडॉरपैकी (अतिजलद गाडय़ा) मुंबई-अहमदाबाद या कॉरीडॉरसाठी जपानने यापूर्वीच अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी दर्शवली आहे.
भारत आणि चीनमध्ये विविध क्षेत्रामध्ये परस्पर सामंजस्य करार झाल्यानंतर चीनचे ४२ उच्चाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट दिली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची भेट घेऊन या शिष्टमंडळाने रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीची, प्रवासी आरक्षण पद्धतीची माहिती जाणून घेतली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेतून रोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात, हे समजल्यावर आमच्या बीजिंग आणि शांघाय शहरांमध्येही जवळपास तितकेच प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, अशी माहिती या शिष्टमंडळात असलेल्या रेल्वे मंत्र्यांनी दिली.
२०१०-११ मध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पात सहा हायस्पीड कॉरीडॉरची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडॉरसाठी जपानने यापूर्वीच सामंजस्य करार केला आहे. वेगवान गाडय़ा चालविण्याबाबत जपानपेक्षा चीनचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे.
 रेल्वेच्या हायस्पीड कॉरीडॉरमध्ये मुंबई-नागपूर कॉरीडॉरसाठी मुख्यमंत्री अधिक प्रयत्नशील असून यासाठी चीनचे तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता अधिक असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
हायस्पीड कॉरीडॉर पाठोपाठ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचीही योजना रेल्वे प्रशासनाने आखली असून चीनने त्यातही आपला रस असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘स्थानक विकास प्राधिकरण’ स्थापण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
चीनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली स्थानके उभारण्यात येतील. यात मुंबईसह मध्ये रेल्वेच्या काही स्थानकांसह देशातील काही प्रमुख स्थानकांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.    

जपानपेक्षा चिनी तंत्रज्ञानाला प्राधान्य
वेगवान गाडय़ा चालविण्याबाबत जपानपेक्षा चीनचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. रेल्वेच्या हायस्पीड कॉरीडॉरमध्ये मुंबई-नागपूर कॉरीडॉरसाठी मुख्यमंत्री अधिक प्रयत्नशील असून यासाठी चीनचे तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता अधिक असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader