आदिवासी विभागात गेली चार वर्षे सातत्याने खरेदीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून हा विभाग ठेकेदारांच्या हातचे कळसूत्री बाहुले झाल्याची टीका विधानसभेत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. गेल्या चार वर्षांमधील अन्नधान्य खरेदी, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या कपडे खरेदीची तसेच बिस्किट व अन्य खरेदीची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे एका पत्राद्वारे केली आहे. चंबळच्या खोऱ्यातील डाकूंना लाजवणारी ही लुटमार असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरवर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात आदिवासी विभागातील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला जातो. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकीकडे दुष्काळाबाबत चिंता व्यक्त करून मंत्र्यांना काम करण्याचे आदेश देतात तर त्यांच्याच पक्षाचे आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विभागात दुप्पट ते चौपट दराने कोटय़वधी रुपयांची खरेदी करून शासकीय तिजोरीवर डल्ला मारला जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
 रेशन दुकानांवर साडेचार ते साडेपाच रुपयांनी तांदूळ व गहू उपलब्ध असतानाही १८ रुपये व २३ रुपये किलो दराने ७० कोटी रुपयांचा तांदूळ खरेदी कसा केला जातो? पार्ले ग्लुकोजच्या शंभर ग्रॅम पुडय़ाची बाजारात नऊ रुपये किंमत असताना आयुर्वेदिक व नाचणीच्या बिस्किटांची सोळा व २३ रुपयांनी खरेदी कशी होते? आश्रम शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाईटड्रेस १८ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय कसा झाला, असे प्रश्न उपस्थित करून फडणवीस यांनी सीबीआयच्या आरोपपत्रात ज्या ठेकेदाराचे नाव आहे त्यांनाच पुन्हा कंत्राट कसे दिले गेले, असा सवाल केला. आमदार विवेक पंडित, मनसेचे गटनेते बाळा नांदगावर, आमदार गेडाम यांच्यासह अनेक आमदारांनी आदिवासी विभागातील भ्रष्टाचारावर आवाज उठवला असून आदिवासी विकास आयुक्त व सचिवांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Story img Loader