राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांची दैन्यावस्था ओढवली आहे. ती काही आमच्यामुळे गेल्या आठ महिन्यांत झालेली नाही, अशी खरमरीत टीका करीत, दुष्काळ पडल्यास शेतकऱ्यांना द्यावयाची मदत सप्टेंबरनंतर नजर आणेवारीनंतरच देता येईल, असे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. ही मदत ऑगस्टमध्ये देता येत नाही, हे ‘जाणता राजा’ असलेल्या पवार यांना माहीत असेलच, त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा आम्हालाही द्यावा, अशी खोचक टिप्पणीही खडसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. त्यामुळे पवार यांनी मागण्या करताच शेतकऱ्यांसाठी सरकारकडून तूर्तास कोणतीही नवीन मदत दिली जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
पवार यांच्याबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य नेते हे गेले दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल वसुलीस स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन आदी अनेक मागण्या करीत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या संदर्भात विचारता खडसे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. लातूर, बीड व उस्मानाबाद हे तीन जिल्हे वगळता राज्यात पावसाची व पिकांची परिस्थिती सुधारत आहे. वीज बिल सवलत, शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कमाफी, कर्जाचे पुनर्गठन आदी बाबी या दुष्काळ जाहीर केल्यानंतरच्या उपाययोजनांमध्ये समाविष्ट असतात. कर्जाच्या पुनर्गठनाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली असून ते काम सुरू असल्याची माहिती पवार यांनी घ्यावी. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना पूर्ण व्याजमाफी असून पुढील वर्षीचे निम्मे व्याज सरकार भरणार आहे, असे खडसे म्हणाले. दुष्काळ पडल्यानंतरच्या उपाययोजना या ऑगस्टमध्ये करता येत नाहीत. अंतिम आणेवारी ही जानेवारीमध्ये जाहीर होते आणि अंतरिम स्वरूपात सप्टेंबरमध्ये नजर आणेवारी केली जाते. त्यामुळे आपण केंद्राच्या निकषांप्रमाणे जानेवारीपर्यंत अंतिम आणेवारीची वाट पाहिली नाही, तरी त्याआधी मदत देता येऊ शकेल; पण लगेच आत्ता काहीच करता येणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने आता नुकसानीचे निकष बदलले असून ३३ टक्के पिकांचे नुकसान झाल्यासही भरपाई दिली जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतून, गरज भासेल त्यानुसार मदत केली जाईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2015 रोजी प्रकाशित
पवार यांच्यामुळेच शेतकऱ्यांची दुरवस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांची दैन्यावस्था ओढवली आहे. ती काही आमच्यामुळे गेल्या आठ महिन्यांत झालेली नाही...

First published on: 17-08-2015 at 01:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of farmers