देशाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची हाक दिली आणि हाती झाडू घेत नेते-अभिनेते रस्त्यावर उतरले. तत्कालीन पालिका आयुक्तांनीही प्रोत्साहन घेत दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर दोन तास थांबून कार्यालय स्वच्छ करण्याची सक्ती अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लादली. यापासून प्रोत्साहन घेऊन नगरसेवकांनीही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगारांबरोबर हाती झाडू घेत आपल्यातील समाजसेवकाचे दर्शन घडविले; पण अधिकारी-कर्मचारी आणि नगरसेवकांचा हा उत्साह काही महिन्यांतच मावळला. परिणामी संपूर्ण मुंबईत या अभियानाची ऐशीतैशी झाली. प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला देत नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली. त्यानंतर मुंबईमध्ये स्वच्छता मोहिमेला ऊतच आला होता. नेते-अभिनेते, समाजसेवक आदी मंडळींनी विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होत सफाई कामगारांनी स्वच्छ केलेले रस्ते पुन्हा एकदा झाडले. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्तांनी पालिका कार्यालयांसह संपूर्ण मुंबईत हे अभियान राबविण्याचा मानस व्यक्त केला. पालिका कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन तास थांबून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची साफसफाई करावी, असा फतवा काढण्यात आला. कारवाईच्या भीतीपोटी अधिकारी-कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत कार्यालयाची इमानेइतबारे सफाई करू लागले. त्यांच्यापासून प्रोत्साहन घेऊन काही नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागात आठवडय़ातून एक दिवस सफाई कामगारांबरोबर साफसफाई करण्यास सुरुवात केली. सफाई कामगारांबरोबर हाती झाडू घेऊन नगरसेवकांनी आपल्याला हवी तशी छायाचित्रेही काढून घेतली. काहींनी ही छायाचित्रे आपल्या कार्यालयांतील दर्शनी भागात प्रदर्शितही केली आहेत; पण नगरसेवकांचा सफाईचा उत्साह काही महिनेच टिकला. हळूहळू त्यात खंड पडू लागला आणि गेल्या सहा-सात महिन्यांपासून नगरसेवकांनी सफाई मोहिमेत सहभागी होणेच बंद केले.
भाजप नगरसेवक तरी सफाई अभियानात सातत्याने सहभागी होतील असे वाटले होते; परंतु त्यांनीही इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या पावलावर पाऊल टाकून या मोहिमेतून काढता पाय घेतला. नंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही तशीच अवस्था झाली. अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून उत्साह मावळत असल्याचे पाहून प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे दोन गट करून आलटूनपालटून कार्यालयाची स्वच्छता करावी, असे परिपत्रक जारी करून मोहिमेत धुगधुगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले; पण काही बिलंदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्यालाही हरताळ फासला. अधिकारी कामाचे निमित्त करून शुक्रवारी कार्यालयातून पळ काढू लागल्याने कर्मचारीही थांबेनासे झाली. काही अधिकाऱ्यांनी तर या मोहिमेच्या आडून मर्जी नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या हाती मेमो देण्याचेही प्रताप केले. एकूणच प्रोत्साहन देण्यात प्रशासन कमी पडल्याने कार्यालयांची साफसफाई अभावानेच होऊ लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा