आंदोलनानंतर प्रशासनाची धावपळ
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील रेल्वे कार्यालयाला काही दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठय़ाबाबत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जोरदार दणका दिल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने पाणीपुरवठा करणारी वाहिनी तात्काळ बदलण्याचे आदेश दिले आहेत.
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीमध्ये रेल्वेचे अनेक विभाग असून तेथे जवळपास एक हजार कर्मचारी काम करतात. या कार्यालयांना मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून सर्व विभागांमध्ये पाणी फिरविण्यात आले आहे. काही दिवसांपासून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. पश्चिम रेल्वे मजदूर संघाने याबाबत प्रशासनाला पत्रही दिले होते. मात्र त्यावरही काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. पाण्याची दुर्गंधी वाढू लागल्यावर सोमवारी सकाळी इमारतीमधील सर्व कर्मचारी खाली उतरले आणि त्यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर उत्स्फूर्त निदर्शने सुरू केली. अडीच तास निदर्शने केल्यावर प्रशासनाने पालिकेच्या अभियंत्यांना पाचारण केले. त्यांनी जलवाहिनीची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी वाहिनी फुटली असून त्यात घाणेरडे पाणी मिसळत असल्याचे दिसले. त्यानंतर ती वाहिनी तात्काळ बदलण्याचे आदेश देण्यात आले. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक महेशकुमार यांनी दिल्यावर निदर्शने थांबविण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा